उज्जैन : असं म्हणतात की, पोट भरलेलं असेल तर मन प्रसन्न राहतं. म्हणूनच आपण जे काही कष्ट करतो, मेहनत घेतो ती शेवटी अन्न-पाण्यासाठीच असते. शास्त्रांमध्ये जेवणाला पूजनीय मानलं जातं. म्हणूनच जेवणाचा आदर करावा, प्रत्येक घास व्यवस्थित चावून खावा, असं वडीलधारी माणसं कायम सांगतात. तुम्हाला माहितीये का, आपल्यासोबत भविष्यात घडणाऱ्या वाईट क्षणांचे संकेत कधीकधी जेवणातून मिळत असतात. आपल्याला केवळ ते अचूक ओळखता यायला हवं इतकंच.
advertisement
कधीकधी आपल्या जेवणात केस येतो, मग काहीजणांना पुढे जेवायला किळस वाटते, तर काहीजण तो केस बाजूला काढून व्यवस्थित जेवण करतात. परंतु उज्जैनचे ज्योतिषी रवी शुक्ला सांगतात की, कधीतरी जेवणात केस येणं सामान्य आहे. परंतु जर असं सतत होत असेल तर हे अत्यंत अशुभ मानलं जातं. याचा अर्थ असतो की, तुमच्या घरावर किंवा आयुष्यावर राहूचा प्रभाव वाढलाय आणि राहू म्हणजे अडचणी. मग कदाचित तुम्ही आर्थिक संकटात अडकू शकता. विनाकारण एखाद्या वादात पडू शकता. ज्या व्यक्तीवर राहूचा प्रभाव वाढतो, तिच्या हातात पैसा काही केल्या टिकत नाही.
हेही वाचा : गुरू देणार मोठी संधी, 3 राशींना मिळू शकतं सर्वकाही; 3 महिने तुमचेच!
पितृदोषाचा संकेत
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही जेवायला बसलात आणि ताटात लगेच केस दिसला किंवा पहिल्याच घासात केस आला, तर हा पितृदोषाचा संकेतही असू शकतो. मग कदाचित तुमच्या घरात पितृदोष निर्माण झालेला असू शकतो किंवा कुंडलीत. त्यामुळे जेवणात आलेला हा केस अडथळे दर्शवतो.
जेवणात केस आल्यास काय करावं?
कधीही जेवण बनवण्याआधी केस घट्ट बांधावे, जेणेकरून जेवणात केस येऊ नये. कारण जेवणात केस येणं आरोग्यासाठीही योग्य नसतं. शिवाय राहूचा प्रभाव अत्यंत घातक असतो, त्यामुळे जर जेवणात केस आला तर पुढे ते जेवण करू नये. परंतु ते जेवण फेकू नये, तर प्राण्यांना चारावं.
सतत हातातून जेवण निसटणं...
असं कधीकधी होतं की, आपण जेवण वाढताना अन्नपदार्थ हातातून निसटतात. असं सतत झालं तर तो शुभ संकेत नसतो. यामुळे घरात दारिद्र्य येऊ शकतं. शिवाय आपल्या आरोग्यासंबंधित अडचणीही निर्माण होऊ शकतात. म्हणूनच जेवण बनवताना आणि वाढताना मन एकाग्र असायला हवं.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.