दरवर्षीप्रमाणे यंदाही दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा पाहण्यासाठी शहरासह बाहेरील जिल्ह्यांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळपासून रांगांमध्ये उभ्या भक्तांनी बाप्पांचे दर्शन घेतले आणि आपली मनोकामना व्यक्त केली. या वेळी मंडळाने पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर दिला असून, भाविकांना शिस्तीत दर्शन घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत. तसेच, सुरक्षा व वाहतुकीसाठी पोलीस यंत्रणेने काटेकोर नियोजन केले आहे.
advertisement
गेल्या 125 वर्षांपासून पुण्याचे श्रद्धास्थान ठरलेला दगडूशेठ गणपती हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहे. शिक्षण, आरोग्य, अनाथ व ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे या मंडळाचे वेगळे स्थान आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने गणेशोत्सवाच्या उत्साहाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, पुढील 10 दिवस दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी आणखी वाढणार आहे.
चित्रकुटेतील मठाधिपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा
चित्रकुटातील श्रीदास हनुमान देवस्थानचे मठाधिपती रामानुजाचार्य झालरिया यांच्या हस्ते सकाळी विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक सभा मंडपात श्री श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात आणि भाविक भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आली.