नवरात्र हा हिंदूंचा महत्त्वपूर्ण सण असून या दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र धारण करून आणि त्या दिवशीच्या देवीचे पूजन करून हा सण साजरा केला जातो. दरवर्षी चार नवरात्र असतात. माघ, चैत्र, आषाढ, अश्विन या महिन्यांत दुर्गा मातेची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे. चार नवरात्रांपैकी दोन प्रकट आणि दोन गुप्त नवरात्र असतात. नवरात्रात व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार दुर्गा माता नवरात्रात पृथ्वीवर येतात. त्यामुळे लोक दुर्गामातेच्या नऊ रूपांची नऊ दिवस पूजा करतात. तसेच देवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून उपवास ठेवतात. आता नवीन वर्ष सुरू झाले आहे, त्यामुळे 2025 मध्ये शारदीय नवरात्र कधी असेल ते जाणून घेऊयात.
advertisement
नवरात्र कधी आहे?
हिंदू धर्मात शारदीय नवरात्राला विशेष महत्त्व आहे. या काळात दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आणि नऊ दिवस उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी शारदीय नवरात्राची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून होते. 2025 मध्ये शारदीय नवरात्राची सुरुवात 22 सप्टेंबर रोजी पहाटे 1:23 वाजता होईल. नवरात्र 22 सप्टेंबर रोजी सुरू होईल व 2 ऑक्टोबर 2025 रोजी समाप्त होईल.
शारदीय नवरात्र 2025 घटस्थापना मुहूर्त -
घटस्थापनेचा मुहूर्त 22 सप्टेंबर रोजी सकाळी 06:09 ते 08:06 पर्यंत आहे.
घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त सकाळी 11:49 ते 12:38 पर्यंत आहे.
नवरात्रीचे महत्त्व -
वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्र साजरे केले जाते. नवरात्र साजरं करण्यासंदर्भातील एका प्रचलित पौराणिक कथेनुसार महिषासुर राक्षसाला ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मिळाले होते. त्याचा मृत्यू कोणत्याही मनुष्याच्या, राक्षसाच्या किंवा देवाच्या हातून होणार नव्हता. त्याला फक्त एका महिलेच्या हातूनच मृत्यू येणार होता. हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने मानव आणि देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली. महिषासुराच्या त्रासामुळे वैतागलेले सर्व देव त्रिदेवांजवळ गेले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांनी आदिशक्तीला आवाहन केले. मग महिषासुराचा अंत करण्यासाठी, दुर्गा माता प्रकट झाली, त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी म्हणतात. देवतांकडून शक्ती मिळाल्यानंतर माता दुर्गाने महिषासुराला युद्धासाठी आव्हान दिले. दोघांदरम्यान नऊ दिवस युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी देवी दुर्गाने महिषासूरचा वध केला. याची आठवण म्हणून नवरात्र उत्सव साजरा केला जातो.
नवरात्राचे नऊ दिवस आणि रंग
नवरात्राच्या प्रत्येक दिवसाला एका विशिष्ट रंगाचं महत्त्व असतं आणि लोक सहसा त्याच रंगाचे कपडे त्या दिवशी घालतात. इतकंच नाही, तर नवरात्र सजावटीची थीमही प्रत्येक दिवशीच्या रंगाप्रमाणे वेगवेगळ्या रंगांमध्ये केली जाते. सर्व सजावट आणि रोषणाई संबंधित दिवसाचा जो रंग असेल, त्याप्रमाणे केली जाते. पिवळा, मोरपंखी, राखाडी, नारंगी, पांढरा, लाल, निळा, गुलाबी आणि जांभळा हे प्रमुख नऊ रंग आहेत.
22 सप्टेंबर - पांढरा रंग
पांढरा रंग शुद्धता, शांती आणि साधेपणा दर्शवतो.
23 सप्टेंबर - लाल रंग
लाल रंग आवड आणि प्रेमाचं प्रतीक आहे.
24 सप्टेंबर - गडद निळा
गडद निळा रंग सुख समृद्धी आणि शांततेचं प्रतीक आहे.
25 सप्टेंबर - पिवळा रंग
पिवळा रंग सणाचा उत्साह आणि आनंद दर्शवतो.
26 सप्टेंबर - हिरवा रंग
हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो.
27 सप्टेंबर - राखाडी
राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे.
28 सप्टेंबर - नारंगी रंग
नारंगी रंग उब व सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे.
29 सप्टेंबर - मोरपंखी रंग
मोरपंखी रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक आहे.
30 सप्टेंबर - गुलाबी रंग
गुलाबी रंग प्रेम, आपुलकी आणि सुसंवादाचं प्रतीक मानला जातो.
गुण पाहण्याची गरज नाही! या दोन मूलांकांची जोडी शेवटपर्यंत टिकते; निष्ठावान सोबती
नवरात्रेच्या नऊ देवी आणि त्यांची रुपं
नवरात्रीचा उपवास 9 दिवस ठेवला जातो ज्यामध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्याचा नियम आहे. नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केल्यास चांगले फळ मिळते, असं मानलं जातं.
पहिला दिवस माता शैलपुत्री- पर्वतकन्या माता शैलपुत्री निसर्ग आणि विकासाचे प्रतिनिधित्व करते.
दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणी- या देवीने खूप तपश्चर्या केली, ती भक्ती आणि अध्यात्माचे प्रतीक आहे.
तिसरा दिवस माता चंद्रघंटा- ही शांती आणि स्थिरतेची देवी मानली जाते आणि ती शक्तीचे प्रतिनिधित्व करते.
चौथा दिवस माता कुष्मांडा - या देवीने ब्रह्मांड निर्माण केले. ही सर्जनशीलतेचे प्रतीक आहे.
पाचवा दिवस स्कंदमाता -मातृत्वाचे प्रतिनिधित्व करणारी स्कंदमाता ही भगवान कार्तिकेयांची आई आहे.
षष्ठी कात्यायनी माता - महिषासुराचा पराभव करणारी ही देवी शौर्याचे प्रतीक आहे.
सप्तमी कालरात्री- ही मृत्यू आणि वाईट शक्तींचा नाश करणारी देवी आहे, असे मानले जाते.
अष्टमी महागौरी - पवित्रता आणि ज्ञानाची देवी जी आंतरिक शांतीचे प्रतिनिधित्व करते.
नवमी सिद्धिदात्री - अलौकिक शक्ती प्रदान करणारी माता सिद्धिदात्री आत्मज्ञानाचे प्रतीक आहे.
घर बांधण्यासाठी सर्वोत्तम असतात असे प्लॉट; तिथलं निवासस्थान स्वर्गस्थान बनतं
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)