सध्या टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असून भारतीय खेळाडू चौथ्या कसोटीची तयारी करत आहे. ही कसोटी 23 जुलैपासून सुरू होईल. दरम्यान इकडे भारतात आर्यवीर कोहली या नावाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. हा खेळाडू कोण आहे आणि त्याची अशी चर्चा का होत आहे याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.
कोण आहे आर्यवीर कोहली?
advertisement
आर्यवीर कोहली हा भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या मोठ्या भावाचा, म्हणजेच विकास कोहलीचा मुलगा आहे. 15 वर्षीय आर्यवीर लवकरच दिल्ली प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामात सहभागी होणार आहे.
दिल्ली प्रीमियर लीग हेच ते व्यासपीठ आहे जिथून दिग्वेश राठी आणि प्रियांश आर्य यांसारख्या खेळाडूंना ओळख मिळाली होती. सध्या दिग्वेश लखनऊ सुपर जायंट्स आणि प्रियांश पंजाब किंग्जच्या संघाचा भाग आहेत.अलीकडेच पार पडलेल्या डीपीएलच्या लिलावात आर्यवीर कोहलीला साऊथ दिल्ली सुपरस्टार्स या संघाने आपल्या ताफ्यात घेतले आहे. याच संघातून आगामी हंगामात दिग्वेशही मैदान गाजवताना दिसणार आहे.
आर्यवीर कोहली आपल्या काका विराट कोहलीप्रमाणे क्रिकेटच्या मैदानात झळकण्याची इच्छा बाळगतोय. यासाठी तो मैदानात दिवस-रात्र घाम गाळत आहे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला काका विराट प्रमाणे फलंदाज होण्याचे नाही. तर लेग स्पिनर होण्याची इच्छा आहे. सोशल मीडियावर आर्यवीरचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे.
कोच कोण?
आर्यवीरचे प्रशिक्षक माजी क्रिकेटपटू सरनदीप सिंग आहेत. व्हिडीओमध्ये सरनदीप सिंग त्याला गोलंदाजीचे धडे देत आहेत. पीटीआयसोबत सिंग म्हणाले, आर्यवीर कोहली हा खूपच तरुण आहे. 'कोहली' या आडनावाचा कोणताही ताण नाही. तो खरंच खूप चांगला आणि प्रतिभाशाली खेळाडू आहे. तो सातत्याने सराव करत आहे आणि मेहनत घेत आहे.