टीम इंडियाने यावर्षी शेवटचा टी-20 सामना फेब्रुवारी महिन्यात खेळला होता, यानंतर भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये वेगवेगळ्या टीमकडून टी-20 मॅच खेळले, पण आता आयपीएल संपूनही तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे, त्यामुळे भारतीय खेळाडूंची मॅच प्रॅक्टिस झालेली नाही. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवही शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे.
बांगलादेशबद्दलचा निर्णय महागात पडणार?
खरंतर टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होती. या दौऱ्यात 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज होणार होती, पण भारत-बांगलादेश यांच्यातल्या बिघडलेल्या संबंधांमुळे ही स्पर्धा सप्टेंबर 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर गेली असती, तर त्यांना आशिया कपआधी पुरेशी मॅच प्रॅक्टिस मिळाली असती.
advertisement
इतर टीमची सीरिज सुरू
दुसरीकडे आशिया कपमध्ये खेळणाऱ्या बहुतेक टीम या मैदानामध्ये दिसत आहेत. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि युएई यांच्यामध्ये टी-20 ट्रॅन्ग्युलर सीरिज सुरू आहे, तर दुसरीकडे श्रीलंका झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेली आहे. या दौऱ्यातल्या 2 वनडेमध्ये श्रीलंकेचा विजय झाला असून 3 टी-20 मॅचची सीरिज बुधवारपासून सुरू होणार आहे.
आशिया कपसाठी पाकिस्तान, अफगाणिस्तान, युएई आणि श्रीलंका या टीम मॅच प्रॅक्टिससह मैदानात उतरणार आहेत, दुसरीकडे भारतीय खेळाडू मात्र मोठ्या विश्रांतीनंतर कमबॅक करणार आहेत, त्यामुळे ही विश्रांती टीम इंडियासाठी धोक्याची ठरू नये, अशीच अपेक्षा चाहत्यांना आहे.