पुन्हा एकदा टीमसोबत जोडलं जाण्याची इच्छा आहे. भविष्यात टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायची जबाबदारी घेण्यासही मी तयार आहे. माझ्या अनुभवाचा युवा खेळाडूंना फायदा होत असेल तर मला आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया चेतेश्वर पुजारा याने दिली आहे. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरीच वर्ष खेळून अनुभव मिळवला आहे, हा अनुभव मी युवा खेळाडूंसोबत वाटायला तयार आहे, असं पुजारा म्हणाला आहे. पुजाराने हे वक्तव्य करून एक प्रकारे बीसीसीआयला आपण कोचिंगची मोठी जबाबदारी उचलायला तयार असल्याचे संकेत दिले आहेत.
advertisement
पुजाराकडून ऑफर, BCCI काय करणार?
'कोच होण्यासाठी सगळ्यात मोठी खासियत म्हणजे विपरीत परिस्थितीमध्येही शांत राहणं. 17व्या वर्षापासून मी हेच शिकलो आहे, जे माझ्या क्रिकेट करिअरमध्येही कामाला आलं. भविष्यात जर कोच व्हायची जबाबदारी मिळाली, तर तेव्हाही हीच गोष्ट कामाला येईल', असं वक्तव्य पुजाराने केलं आहे. काही दिवसांपूर्वी सौरव गांगुलीनेही टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायची इच्छा व्यक्त केली होती, यानंतर आता चेतेश्वर पुजारानेही उघडपणे टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायचे संकेत दिले आहेत, त्यामुळे आता बीसीसीआय यावर काय प्रतिक्रिया देणार? याकडे लक्ष लागलं आहे.
पुजाराचं करिअर
चेतेश्वर पुजाराने भारताकडून 103 टेस्ट मॅचमध्ये 43.61 च्या सरासरीने 7,195 रन केले, ज्यामध्ये 19 शतकं आणि 3 द्विशतकांचा समावेश होता. टीम इंडियाला अनेक ऐतिहासिक मॅच जिंकवण्यात पुजाराने मोलाचं योगदान दिलं. भारताने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियामध्ये दोन वेळा टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला, या दोन्ही सीरिजमध्ये पुजारा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला होता.