जम्मू-काश्मीर आणि बडोद्यामध्ये रणजी ट्रॉफीची मॅच सुरू आहे. दोन्ही टीमसाठी रणजी मोसमाची ही शेवटची मॅच आहे. रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये जम्मू-काश्मीर खेळणार का बडोदा? हे या मॅचच्या निकालावरून ठरणार आहे. जम्मू-काश्मीरने हा सामना ड्रॉ केला तरीही ते क्वार्टर फायनलमध्ये जातील, तर कृणाल पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बडोद्याला हा सामना जिंकावा लागणार आहे. मुंबईने या ग्रुपमधून आधीच क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे.
advertisement
जम्मू-काश्मीरचा बडोद्यावर आरोप
शनिवारी मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंनी बडोद्याच्या टीमवर आरोप केला. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार जम्मू-काश्मीरचे कोच अजय शर्मा यांनी अंपायर आणि मॅच रेफ्रीकडे याची तक्रार केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पिचचा रंग आणि स्थिती जशी होती, तशी तिसऱ्या दिवशी सकाळी नव्हती. पिच बघितलं तर त्यासोबत छेडछाड केल्याचं दिसत आहे, असा आरोप अजय शर्मा यांनी केला आहे.
अजय शर्मा यांच्या या आरोपांनंतर मॅच सुरू व्हायला उशीर झाला. 9.30 वाजता सुरू होणारा सामना दीड तासानंतर सुरू झाला. पण बीसीसीआयने खेळ उशीरा सुरू व्हायला पिचमध्ये ओलावा असल्याचं कारण सांगितलं. दुसरीकडे बडोदा क्रिकेट असोसिएशनने जम्मू-काश्मीरचे प्रशिक्षक अजय शर्मा यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी लावलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही, आम्ही बीसीसीआयच्या संपर्कात आहोत, अशी प्रतिक्रिया बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जम्मू-काश्मीर मजबूत स्थितीमध्ये
या सामन्यामध्ये जम्मू-काश्मीर मजबूत स्थितीमध्ये आहे. पहिल्या इनिंगमध्ये 246 रन केल्यानंतर जम्मू-काश्मीरने बडोद्याला 166 रनवर ऑलआऊट केलं, त्यामुळे त्यांना पहिल्या इनिंगमध्ये 80 रनची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जम्मू-काश्मीरने 125 रनवर एक विकेट गमावली होती. तिसऱ्या दिवशी त्यांचा 284 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे बडोद्याला विजयासाठी 365 रनचं आव्हान मिळालं. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बडोद्याचा स्कोअर 2 विकेटवर 58 रन एवढा झाला आहे.
भारतीय क्रिकेटमधला 24 तासातला हा दुसरा वाद आहे. एक दिवस आधीच भारत-इंग्लंड टी-20 सामन्यात हर्षित राणाला कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात आणल्यामुळे वाद निर्माण झाला. शिवम दुबेला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी कनकशन सबस्टिट्युट म्हणून हर्षित राणाला टीम इंडियाने मैदानात आणलं. इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने यावर टीका केली आहे. शिवम दुबेऐवजी हर्षित राणा ही लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट नसल्याचं म्हणत बटलरने नाराजी व्यक्त केली.