नेमका वाद काय होता?
फेब्रुवारी 2023 मध्ये एका उपनगरीय हॉटेलमध्ये सेल्फी काढण्यावरून पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी शॉवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली गिलला काही जणांसह अटक करण्यात आली होती. जामीन मिळाल्यानंतर सपना गिलने शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्याविरोधात कथित विनयभंगाची तक्रार दाखल करण्यासाठी एअरपोर्ट पोलीस ठाण्यात संपर्क साधला होता, पण पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. यानंतर, गिलने अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात धाव घेतली आणि पोलिसांना शॉ विरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. मात्र, मॅजिस्ट्रेटने फक्त पोलीस चौकशीचे आदेश दिले.
advertisement
कोर्टात काय घडलं?
मॅजिस्ट्रेटच्या आदेशाला आव्हान देत सपना गिलने एप्रिल 2024 मध्ये डिंडोशी सत्र कोर्टात फौजदारी पुनरीक्षण याचिका (Criminal Revision Application) दाखल केली. कोर्टाने पृथ्वी शॉला या याचिकेवर उत्तर देण्यासाठी अनेक तारखा दिल्या. मात्र, मंगळवारी झालेल्या सुनावणीत शॉने कोणतेही उत्तर दाखल केले नाही. कोर्टाने म्हटले की, 'गेल्या तारखेला पृथ्वी शॉला शेवटची संधी देण्यात आली होती, पण त्याने कोणतेही उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे 100 रुपयांच्या दंडासह त्याला आणखी एक संधी दिली जात आहे.'
सपना गिलचे वकील म्हणतात...
दरम्यान, सपना गिलचे वकील अली काशिफ खान यांनी सांगितले की, शॉला अनेक वेळा समन्स पाठवूनही त्याने नियमितपणे टाळाटाळ केली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे.