एकीकडे भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या आंतरराष्ट्रीय मॅचसाठी प्रेक्षक गर्दी करत नाहीयेत, पण दुसरीकडे रोहित शर्माची नेट प्रॅक्टिस पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना व्हायच्या आधी रोहित शर्मा हा शिवाजी पार्कवर नेट प्रॅक्टिस करायला आला होता, तेव्हा त्याला पाहण्यासाठी शिवाजी पार्कच्या मैदानात मोठी गर्दी झाली होती. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी अखेर रोहितला थोडं लांब उभे राहा, अशी विनंती प्रेक्षकांना करावी लागली आहे.
advertisement
रोहितचं कमबॅक
रोहित शर्मा तब्बल 7 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकल्यानंतर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. टी-20 आंतरराष्ट्रीयमधून रोहितने मागच्या वर्षीच निवृत्ती घेतली, तर इंग्लंड दौऱ्याआधी रोहितने टेस्ट क्रिकेटलाही अलविदा केलं, त्यानंतर 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये सुरू होणाऱ्या वनडे सीरिजसाठी रोहितची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. 3 वनडे मॅचच्या या सीरिजसाठी रोहित शिवाजी पार्क मैदानात सरावासाठी आला होता. येत्या काही दिवसांमध्ये रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.
रोहित शर्मा पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीमधून खेळताना दिसणार असला तरी त्याची कॅप्टन्सी काढून घेण्यात आली आहे. रोहित शर्माऐवजी शुभमन गिलला भारताच्या वनडे टीमचं कर्णधार करण्यात आलं आहे. 2027 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी गिलकडे नेतृत्व देण्यात आल्याच टीम इंडियाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे रोहित शर्मा आणि विराट कोहली टीमच्या 2027 वनडे वर्ल्ड कपच्या योजनांचा भाग असल्याचं कर्णधार शुभमन गिलने स्पष्ट केलं आहे.