बुची बाबू स्पर्धेमध्ये जम्मू काश्मीरकडून खेळताना उमरान मलिकने भेदक बॉलिंग केली आहे. आयपीएल आणि स्थानिक स्पर्धांमध्ये उमरान मलिकने त्याच्या फास्ट बॉलिंगची चुणूक आधीच दाखवली होती, पण वर्षभरापेक्षा जास्त काळ उमरान मलिक फिटनेसमुळे बाहेर होता. बुची बाबू स्पर्धेमध्ये ओडिशाविरुद्ध खेळताना उमरान मलिकने बॅटरचा मिडल स्टम्प उखडून टाकला.
ओडिशाविरुद्धच्या सामन्यात उमरान मलिकने काही बॉलमध्येच दोन विकेट घेतल्या. इनिंगच्या पहिल्याच ओव्हरमध्ये बॅटरला उमरान मलिकचा स्पीड झेपला नाही आणि तो बोल्ड झाला. यानंतर लगेचच पुढच्या ओव्हरमध्ये उमरान मलिकचा बॉल स्विंग झाला आणि बॅटरच्या बॅट आणि पॅडमधून गेला आणि मिडल स्टम्प बाहेर आला. उमरान मलिकच्या या भेदक बॉलिंगचा व्हिडिओही समोर आला आहे.
उमरान मलिक कमबॅक करणार?
आयपीएल 2022 मध्ये उमरान मलिकने धमाका केला होता, जेव्हा त्याने मोसमात 22 विकेट घेतल्या. आयपीएल 2022 च्या मोसमात उमरान मलिकने 157 किमी प्रती तासाच्या वेगानेही बॉल टाकला होता, पण पुढची 3 वर्ष उमरानला फिटनेसने ग्रासलं. या काळात उमरान भारताकडून 10 टी-20 आणि काही वनडे मॅच खेळला. आयपीएल 2025 साठी उमरान मलिकला केकेआरने टीममध्ये घेतलं, पण दुखापतीमुळे तो पुन्हा बाहेर झाला. आता बुची बाबू स्पर्धेमध्ये उमरान मलिकने पुन्हा एकदा त्याची थरारक बॉलिंग दाखवून दिली आहे, त्यामुळे आता उमरान टीम इंडियात कमबॅक करणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.