कोल्हापूर : कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील नेमबाज स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत कांस्यपदकाची कमाई केली आहे. त्यामुळेच स्वप्नीलच्या आई, वडील, भाऊ, गावकरी यांच्यासह कोल्हापुरातील क्रीडाप्रेमींमध्येही अत्यंत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. स्वप्निल सराव करत असलेल्या कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंज परिसरात त्याच्या मित्र परिवारासह सहकारी आणि मार्गदर्शकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.
advertisement
स्वप्निलने असे मिळवले ऑलम्पिकमध्ये पदक
एकूण 8 स्पर्धकांसह झालेला 50 मीटर रायफल शूटिंगचा अंतिम सामना हा अत्यंत अटीतटीचा राहिला. 40 शॉट्समध्ये शेवटपर्यंत सर्वात कमी गुण असणारे स्पर्धक यामधून बाहेर होत गेले. यामध्ये 3 पोझिशन नेमबाजीत निलिंग म्हणजेच गुडघ्यावर बसून नेमबाजी करताना स्वप्निल तीन मालिका पूर्ण झाल्यानंतर 153.3 गुण मिळवून सहाव्या स्थानावर राहिला. पुढे प्रोन अर्थात झोपून नेमबाजी करताना स्वप्नील 310.1 गुणांसह पाचव्या स्थानावर आला. तर पुढे स्टॅंडिंग अर्थात उभे राहून नेमबाजी करताना स्वप्निल तिसऱ्या स्थानापर्यंत आला. तर अखेरच्या राऊंडमध्ये चमकदार कामगिरीसह युक्रेनच्या स्पर्धकाने प्रथम आणि चीनच्या स्पर्धकाने द्वितीय स्थानावर आपली जागा कायम ठेवली. त्यामुळे युक्रेनच्या खेळाडूने सुवर्ण, चीनच्या खेळाडूने रौप्य आणि स्वप्निल कुसाळेने कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.
Swapnil Kusale : फायनलसाठी गावातली मंडळी स्वप्नीलच्या घरी, निकाल लागताच एकच जल्लोष, VIDEO
कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुल या ठिकाणच्या शूटिंग रेंजमध्ये स्वप्निल त्याचा सराव करत असे कोरोना काळात अगदी योग्य सोयीसुविधा उपलब्ध नसताना देखील स्वप्निलने या ठिकाणी त्याचा सराव नियमित सुरू ठेवला होता. त्याच्या या परिश्रमाच्याच फळ आता त्याला मिळाले आहे. पॅरिसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये देखील त्याने आपल्या खेळाचे योग्य प्रदर्शन केलेले पाहायला मिळाले. संपूर्ण सामन्यावेळी तो अत्यंत शांत पण तितकाच आत्मविश्वासाने भारलेला असल्याचे जाणवत होते, असे मत तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
शाहू माने हा एक आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू असून स्वप्निल कुसाळेचा खास मित्र देखील आहे. गेली काही वर्षे स्वप्निल सोबतच तोदेखील कोल्हापुरातील शूटिंग रेंजमध्ये सराव करतो. तर स्वप्निल प्रमाणेच तो देखील टीसी म्हणून भारतीय रेल्वेमध्ये सध्या कार्यरत आहे. कोणत्याही प्रसंगी संभ्रमात पडल्यानंतर नेहमीच स्वप्निलची मदत घेत असल्याची आठवण शाहू याने सांगितली आहे तर पॅरिसमध्ये स्वप्निलने बदकाची कमाई केल्याचा कोल्हापूरकरांचे सहज देशवासी यांनाही मोठा अभिमान आहे. खेळत असताना अगदी एकाग्र होऊन खेळत असतो. आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीमुळे त्याचे लक्ष तो विचलित होऊ देत नाही. हेच त्याच्या खेळाचे वैशिष्ट्य राहिले आहे असे शाहू यांनी सांगितले आहे.
तर शूटिंग रेंजमध्ये अजूनही बरेच खेळाडू स्वप्निलला सराव करताना पाहत असत. त्यापैकीच एक असलेल्या समर्थ मंडलिक याने देखील खेळाडू म्हणून स्वप्नीलकडे पाहिले आहे. खेळाबाबत कुठलीही अडचण त्यांना विचारले असता ते नेहमीच मदत करत आले आहेत. स्वप्निल कुसाळे यांच्या खेळातील विशेषतेमुळे त्यांच्याकडून नक्कीच ऑलिंपिकमध्ये पदक मिळणार, असा विश्वास आम्हाला सर्वांना वाटत असल्याचे मत समर्थने व्यक्त केले आहे.
तसेच शूटिंग रेंजमध्ये असलेल्या जुनियर नेमबाजानी देखील स्वप्निल कुसाळे याने पदक मिळवण्याचा आनंद साजरा केला आहे. सुरुवातीपासून स्वप्नील रँकिंग खालचे होते. मात्र रँकिंगचा कोणताही विचार न करता डोक्यात शांत ठेवत आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्याने हे यश खेचून आणले आहे, ही सर्वांसाठी खूप अभिमानाची बाब आहे.
दरम्यान सर्वांनीच मोठ्या आनंदाने स्वप्निलला यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तर अशाच प्रकारे भविष्यात त्याची भरभराट होत राहो असेच मत व्यक्त केले आहे.