वेणू गोपाळ करवा हे पुण्यातील इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहे. सुमारे 14 वर्षे त्यांनी विविध कंपन्यांमध्ये काम केलं, त्यातील मुख्य अनुभव त्यांना एका जर्मन कंपनीमध्ये ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात काम करताना मिळाला. कामादरम्यान त्यांना विविध तंत्रज्ञान, ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली आणि औद्योगिक विजेच्या कार्यक्षम वापराविषयी सखोल माहिती मिळाली. तिथूनच एक कल्पना मनात रुजली. विदेशी तंत्रज्ञानाची गरज का? आपणच असं काही का विकसित करू नये? याच विचारातून 2013 साली ‘व्हीनस टेक्नो क्राफ्ट’ या कंपनीची स्थापना त्यांनी केली.
advertisement
वेणू गोपाळ करवा यांच्या नेतृत्वाखाली ‘व्हीनस टेक्नो क्राफ्ट’ने दोन खास उपकरणं विकसित केली आहेत. एक आहे पॉवर फॅक्टर कंट्रोल पॅनल, आणि दुसरं हार्मोनिक फिल्टर पॅनल. ही दोन्ही उपकरणं मुख्यतः मोठ्या कंपन्यांमध्ये, हॉस्पिटल्स आणि मोठ्या कमर्शियल इमारतींमध्ये वापरली जातात. या यंत्रांमुळे वोल्टेज आणि करंट यामधील तफावत कमी होते. त्यामुळे विजेचा अपव्यय टळतो आणि वीज अधिक कार्यक्षमतेने वापरली जाते. याचा थेट फायदा म्हणजे 7 ते 15 टक्क्यांपर्यंत विजेची बचत होते. पूर्वी ही उपकरणं विदेशातून आयात करावी लागायची, पण आता हेच तंत्रज्ञान ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाखाली पुण्यातील त्यांच्या फॅक्टरीमध्ये तयार केलं जातं आहे.
उद्योग, बचत आणि रोजगार
वेणू गोपाळ यांच्या ‘व्हीनस टेक्नो क्राफ्ट’मधून आज 25 ते 30 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतोय. देशभरातील अनेक मोठ्या उद्योगांनी ही उपकरणं वापरायला सुरुवात केली आहे. या तंत्रज्ञानामुळे कंपन्यांना ऊर्जा बचतीसोबतच आर्थिक खर्चातही मोठा दिलासा मिळतोय. आज ‘व्हीनस टेक्नो क्राफ्ट’ हे फक्त एक स्टार्टअप न राहता, वीज बचतीच्या क्षेत्रात एक विश्वासार्ह नाव बनलं आहे.