ऑनलाइन रिलेशनशिप स्कॅम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणूक झालेली 35 वर्षीय तरुणी ठाण्यात राहते आणि ती तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी वास्तव्यास आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये तिची इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर एका तरुणाशी ओळख झाली. सुरुवातीला केवळ ओळख असलेली ही मैत्री काही दिवसांतच जवळीक वाढवत प्रेमात बदलली. विशेष म्हणजे या संपूर्ण कालावधीत तरुणीने त्या तरुणाला कधीही प्रत्यक्ष भेटले नव्हते.
advertisement
जानेवारी 2023 मध्ये संबंधित तरुणाने आपल्या व्यवसायाचे पैसे बँकेत अडकले असल्याचे सांगून आर्थिक अडचण असल्याची माहिती दिली. पैसे नसतील तर काही दिवसांसाठी सोन्याचे दागिने दे, आठ ते दहा दिवसांत ते परत करेन असे आश्वासन त्याने तरुणीला दिले. प्रेम आणि विश्वासाच्या भरवशावर तरुणीने एक दिवस घरात कोणी नसताना बहिणीच्या कपाटातील सोन्याचे दागिने काढले आणि त्या तरुणाने सांगितलेल्या व्यक्तीकडे ते दिले.
तरुणीने दिले दागिने, तरुणाने नंतर संपर्क तोडला
काही दिवस उलटूनही दागिने परत न मिळाल्याने तरुणीने त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. नंतर त्याने संपर्कही बंद केला. हा प्रकार लक्षात येताच तरुणीने बहिणीला सर्व सांगितले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तरुणीने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.
