उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे-घोडबंदर मार्गावरील खड्ड्यांबाबत महापालिका आयुक्तांना फटकारले होते. त्यानंतर या घाटमार्गाची पुन्हा दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शनिवारी सायंकाळपासून या मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात येणार आहे.
Mumbai Local: मध्य रेल्वेवर 12 दिवस खोळंबा! ट्रेनचे मार्ग बदलले, लोकल रद्द, पाहा सविस्तर
घोडबंदर मार्गावर नेहमीच वर्दळ
advertisement
घोडबंदर मार्गावरून रोज हजारो अवजड वाहने उरण जेएनपीए येथून गुजरात, वसईच्या दिशेने वाहतूक करतात. तसेच गुजरात येथून भिवंडी, उरण जेएनपीए आणि नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक असते. मीरा भाईंदर, वसई, ठाणे, बोरीवली भागातील नोकरदार, प्रवाशांसाठी देखील हा मार्ग महत्त्वाचा आहे.
प्रवेश बंदी आणि पर्यायी मार्ग
मुंबई, ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना कापूरबावडी, माजिवडा वाय जंक्शन येथे प्रवेश बंदी असेल. या मार्गावरील वाहने खारेगाव टोलनाका, अंजुरफाटा मार्गे किंवा कशेळी, अंजुरफाटा मार्गे पुढे जातील.
मुंब्रा, कळवा येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खारेगाव, मानकोली, अंजुरफाटा मार्गे पुढे जातील.
नाशिकहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना मानकोली येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने मानकोली पुलाखालून अंजुरफाटा मार्गे जातील.
दरम्यान, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून ठाणे-घोडबंदर मार्गावरील गायमुख ते वर्सोवा चौक (फाउंटन हॉटेल) पर्यंतचा सुमारे साडेचार किलोमीटर लांबीचा रस्ता मीरा-भाईंदर महापालिकेला हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. यंदा या रस्त्यावर वारंवार खड्डे पडत असल्याने महापालिकेने चार वेळा दुरुस्तीचे काम केले; मात्र तरीदेखील खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे.






