ठाणे-घोडबंदर मार्गावर रविवारी ‘या’ वाहनांना प्रवेश बंदी, कारण काय? पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
ठाणे-घोडबंदर रोडवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवारी या मार्गावरून अवजड वाहतूक बंद राहणार आहे.
ठाणे: ठाणे ते घोडबंदर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येथील घाटरस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरून ठाणे शहरात प्रवेश करण्यास अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून रविवारी रात्री 12 पर्यंत ही प्रवेश बंदी असेल. याबाबत वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे-घोडबंदर मार्गावरील खड्ड्यांबाबत महापालिका आयुक्तांना फटकारले होते. त्यानंतर या घाटमार्गाची पुन्हा दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शनिवारी सायंकाळपासून या मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात येणार आहे.
घोडबंदर मार्गावर नेहमीच वर्दळ
घोडबंदर मार्गावरून रोज हजारो अवजड वाहने उरण जेएनपीए येथून गुजरात, वसईच्या दिशेने वाहतूक करतात. तसेच गुजरात येथून भिवंडी, उरण जेएनपीए आणि नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक असते. मीरा भाईंदर, वसई, ठाणे, बोरीवली भागातील नोकरदार, प्रवाशांसाठी देखील हा मार्ग महत्त्वाचा आहे.
advertisement
प्रवेश बंदी आणि पर्यायी मार्ग
मुंबई, ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना कापूरबावडी, माजिवडा वाय जंक्शन येथे प्रवेश बंदी असेल. या मार्गावरील वाहने खारेगाव टोलनाका, अंजुरफाटा मार्गे किंवा कशेळी, अंजुरफाटा मार्गे पुढे जातील.
मुंब्रा, कळवा येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खारेगाव, मानकोली, अंजुरफाटा मार्गे पुढे जातील.
advertisement
नाशिकहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना मानकोली येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने मानकोली पुलाखालून अंजुरफाटा मार्गे जातील.
दरम्यान, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून ठाणे-घोडबंदर मार्गावरील गायमुख ते वर्सोवा चौक (फाउंटन हॉटेल) पर्यंतचा सुमारे साडेचार किलोमीटर लांबीचा रस्ता मीरा-भाईंदर महापालिकेला हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. यंदा या रस्त्यावर वारंवार खड्डे पडत असल्याने महापालिकेने चार वेळा दुरुस्तीचे काम केले; मात्र तरीदेखील खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
November 22, 2025 11:01 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
ठाणे-घोडबंदर मार्गावर रविवारी ‘या’ वाहनांना प्रवेश बंदी, कारण काय? पर्यायी मार्ग कोणते?


