इराणच्या सरकारी दूरदर्शन वाहिनीच्या माहितीनुसार, मोअल्लेम बुलेव्हार्ड परिसरातील आठ मजली निवासी इमारतीत हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की इमारतीचे दोन संपूर्ण मजले उद्ध्वस्त झाले, तर आसपास उभ्या असलेल्या वाहनांचे आणि जवळच्या दुकानांचेही मोठे नुकसान झाले.
राज्य माध्यमांनी दाखवलेल्या दृश्यांमध्ये इमारतीचा संपूर्ण पुढील भाग अक्षरशः उडालेला दिसत असून, स्फोटाचा मलबा सर्वत्र पसरलेला, इमारतीच्या आतला भाग उघडा पडलेला स्पष्टपणे दिसत होता. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्कालीन बचाव पथके आणि वैद्यकीय सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना मदत करण्यासाठी आणि अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले.
इराणच्या अधिकृत IRNA वृत्तसंस्थेने, होर्मोजगान प्रांताचे आपत्ती व्यवस्थापन संचालक मेहरदाद हसनझादेह यांच्या हवाल्याने सांगितले की, या स्फोटाचे कारण सध्या तपासाधीन आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इराणमधील अनेक स्थानिक आणि राष्ट्रीय माध्यमांनीही याच स्वरूपाच्या बातम्या दिल्या असून, स्फोटामागील कारणांबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता नसल्याचे सर्वांनी नमूद केले आहे.
दरम्यान तस्नीम न्यूज एजन्सी या अर्ध-अधिकृत वृत्तसंस्थेने सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या त्या दाव्यांना फेटाळून लावले आहे, ज्यामध्ये हा स्फोट इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या नौदलातील एका कमांडरला लक्ष्य करून करण्यात आल्याचा दावा केला जात होता. तस्नीमने हे दावे “पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे” असल्याचे स्पष्ट केले आहे.
IRGC ही इराणच्या सुरक्षा व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची संस्था असून, ती थेट सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनी यांना अहवाल देते. हा स्फोट अशा वेळी झाला आहे, जेव्हा संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव वाढलेला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर अमेरिकेने या भागात एअरक्राफ्ट कॅरिअर गट तैनात केला आहे.
बुधवारी ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा इशारा देत, अणु कार्यक्रमाबाबत चर्चेच्या टेबलावर परत येण्याचे आवाहन केले होते. अन्यथा अमेरिकेकडून अधिक कठोर लष्करी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणी नेतृत्वाला तातडीने चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन करत, इराणला अण्वस्त्र विकसित करण्यापासून कायमस्वरूपी रोखणारा करार करण्याची गरज असल्याचे म्हटले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, राजनैतिक मार्गासाठी वेळ वेगाने संपत चालली आहे.
“इराणने लवकरात लवकर चर्चेसाठी पुढे यावे आणि सर्वांसाठी फायदेशीर, न्याय्य असा करार करावा अण्वस्त्रे नाहीत. वेळ अत्यंत महत्त्वाची आहे,” असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
आपल्या पहिल्या कार्यकाळात 2015 मध्ये झालेल्या बहुपक्षीय अणुकरारातून अमेरिकेला बाहेर काढणाऱ्या ट्रम्प यांनी, याआधी इराणकडून इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यानंतर अमेरिकेने कशी मोठी लष्करी कारवाई केली होती, याचाही उल्लेख केला. हा उल्लेख भविष्यातील संभाव्य परिणामांचा इशारा म्हणून पाहिला जात आहे.
