एका ब्लॉगरने व्हिडीओ शेअर केला आहे. धरालीमध्ये एकदा नाही, तर तीन ते चार वेळा ढिगारा खाली आला. त्यामुळे मोठी जीवितहानी झाली. जेव्हा हे घडलं तेव्हा धराली आणि मुखवा या दोन्ही गावांमध्ये वार्षिक जत्रेची तयारी सुरू होती. बाहेरगावी कामासाठी गेलेले अनेक जण या जत्रेसाठी आपल्या गावी परतले होते.
उत्तरकाशीची रहिवासी आणि ब्लॉगर असलेली गीता सेमवाल याच काळात आपल्या घरी होती. घटनेच्या दिवशी सकाळी सर्वत्र आनंदी वातावरण होते. डीजेचा आवाज, मुलांची किलबिलाट आणि सणासुदीची तयारी सुरू होती. एकदाम सकारात्मक ऊर्जा होती. अचानक काही कळण्याच्या आत संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाढलं गेलं.
advertisement
खीरा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, त्यानंतर ढगफुटीसदृश्यं झालेल्या पावसानं प्रलय आला. पाणी वाहून आलं पण त्याचा प्रवाह इतका भयंकर होता की आपल्यासोबत माती, झाडं जे दिसेल ते सगळं घेऊन पाणी, माती घरांवर आली. हा प्रवाह इतका मोठा आणि विध्वंस करणारा होता की ढिगाऱ्याखाली संपूर्ण गाव गाढलं गेलं.
गीता सेमवाल यांनी आपल्या घरातून या घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. त्यांनी 'हर्षिल ब्लॉग' या त्यांच्या पेजवर हे व्हिडीओ पोस्ट केले. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, आधी पाण्याची एक मोठी लाट येते आणि सर्वकाही वाहून नेते. त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याचा आणि ढिगाऱ्यांचा मोठा लोंढा येतो. यात पहिल्या लाटेत वाचलेली घरे, दुकाने आणि हॉटेल्सही वाहून जातात. तिसऱ्या लाटेत तर परिस्थिती आणखी गंभीर होते.
ढिगाऱ्यांमध्ये उरलेली सर्वकाही हळूहळू बुडताना दिसते. काही लोक यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आतापर्यंत समोर न आलेले हे व्हिडीओ तपास करणाऱ्या पथकालाही उपयुक्त ठरू शकतात. व्हिडीओमध्ये लष्कराचे जवान काही मिनिटांतच बचावकार्यासाठी धावताना दिसत आहेत. रुग्णवाहिका धावपळ करताना आणि लष्कराचे जवान लोकांना मदत करतानाचे दृश्य यात कैद झाले आहे. जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावताना आणि डोंगरांवर चढून आपला जीव वाचवतानाही दिसत आहेत.
गीता सेमवाल या घटनेबद्दल सांगताना भावूक झाल्या. "माझ्या डोळ्यासमोर आजही ती भयानक दृश्ये आहेत आणि कानात त्या किंकाळ्यांचा आवाज घुमतोय. लोक ढिगाऱ्यांखाली कसे दबले गेले, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. या गावात पुन्हा कधी आनंद परत येईल, हे सांगणे कठीण आहे," असे त्या म्हणाल्या.