झाडं त्यांचे विविध आकार, फुलं, फळं, त्यांचं वय व इतर वैशिष्ट्यांमुळे ओळखली जातात. अशीच एक वनस्पती जगातली सगळ्यात लहान वनस्पती म्हणून ओळखली जाते. तिचं नाव आहे वोल्फिया ग्लोबोसा. ही वनस्पती सगळ्यात लहान फूल असलेलं झाड म्हणून परिचित आहे. या वनस्पतीचं फूल जगातलं सगळ्यात लहान फूल असतं. ते पाहायला मायक्रोस्कोपची गरज भासते.
advertisement
वोल्फिया ग्लोबोसा या फुलाचा व्यास 0.1-0.2 मिलीमीटर इतका असतो. (0.004-0.0008 इंच) त्यामुळे त्या वनस्पतीला जगातल्या सगळ्यात लहान फुलाची वनस्पती असं म्हटलं जातं. या वनस्पतीच्या प्रजातीला आता धोका निर्माण झालाय. काळजी घेतली नाही, तर लवकरच ही प्रजात नष्टही होऊ शकते. मानवी हस्तक्षेपामुळे हा धोका निर्माण झालाय. या वनस्पतीचं वैशिष्ट्य असं, की ती पाण्यातल्या विषारी घटकांना कमी करते. त्यामुळे पाणी स्वच्छ होतं. यामुळेच ही वनस्पती गरजेची आहे.
भारतात ही वनस्पती मध्य प्रदेशात आढळते. भोपाळमध्ये एक मोठा तलाव आहे. तज्ज्ञांच्या मते अंदाजे 32 चौरस किलोमीटरच्या परिसरात हा तलाव आहे. त्यापैकी 26 चौरस किलोमीटरचा भाग दलदलीचा आहे. पर्यावरणतज्ज्ञ अशोक बिसवाल यांच्या मते, याच दलदलीच्या भागात जगातली सगळ्यात छोटी वनस्पती म्हणजेच वोल्फिया ग्लोबोसा आढळते.
ही वनस्पती आकारानं लहान असली तरी त्यातले गुण अतिशय महत्त्वाचे आहेत. पाण्यातल्या सगळ्या प्रकारच्या विषारी जिवांना ती खाऊन टाकते. त्यामुळे पाणी स्वच्छ राहतं. तसंच पाण्यातल्या इतर झाडांना नवसंजीवनी मिळते. ही वनस्पती जगात फार कमी ठिकाणी आढळते. ही वनस्पती दलदलीच्या, शांत व गोड्या पाण्याच्या जागीच विशेषकरून आढळते. या वनस्पतीचं मूळ आशिया हे आहे; मात्र अमेरिका तसंच आफ्रिकेमध्ये काही ठिकाणी ही वनस्पती आढळलेली आहे.