Gauri-Ganpati Visarjan 2025: बाप्पा चालले गावाला..! घरगुती गौरी-गणपती विसर्जन करताना या गोष्टी चुकवू नका
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Gauri-Ganpati Visarjan 2025: गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर गौरीची उत्तरपूजा करून त्यांना निरोप दिला जातो. या पूजेमध्ये गौरीला हळद, कुंकू, नारळ, सुपारी, फराळाचे पदार्थ आणि इतर पूजा साहित्य अर्पण केले जाते.
मुंबई : घरातील गणरायाच्या आगमनानंतर आज विसर्जनाचा दिवस आला आहे. घरगुती गौरी-गणपती विसर्जन अनंत चतुर्दशीपूर्वी केले जाते. गणपती आणि गौरी विसर्जनाला भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये विशेष महत्त्व आहे. हा उत्सव महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन आलेल्या या देवतांना निरोप देताना प्रत्येक भाविकाच्या डोळ्यात एक वेगळीच भावना असते.
गौरी म्हणजे माता पार्वतीचे प्रतीक असून, त्यांना महालक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते. या सणाला माहेरवाशिणींच्या रूपात आलेल्या गौराईंचे स्वागत केले जाते. घरात सुख, समाधान, ऐश्वर्य आणि समृद्धी यावी, यासाठी गौरीचे पूजन केले जाते. असे मानले जाते की, या पूजनाने अखंड सौभाग्य आणि कुटुंबाची भरभराट होते. गणपतीला सुखकर्ता आणि दुःखहर्ता मानले जाते. गणपती विसर्जन हे निसर्गचक्राचे प्रतीक आहे असे मानले जाते. बाप्पाला निरोप देताना 'पुढच्या वर्षी लवकर या' अशी प्रार्थना केली जाते.
advertisement
पूजा-विधी कशी करावी -
गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर गौरीची उत्तरपूजा करून त्यांना निरोप दिला जातो. या पूजेमध्ये गौरीला हळद, कुंकू, नारळ, सुपारी, फराळाचे पदार्थ आणि इतर पूजा साहित्य अर्पण केले जाते. गौरीची आरती झाल्यानंतर दही-भाताचा नैवेद्य दाखवला जातो. गौरीच्या मुखवट्याला किंवा मूर्तीला हलवून विसर्जन केले जाते. विसर्जन करताना 'यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम्। इष्टकामप्रसिद्धयर्थ पुनरागमनाय च।' हा मंत्र म्हणून अक्षता वाहिल्या जातात. अनेक ठिकाणी गौरीच्या आगमनासाठी वाळूच्या खड्यांचा, तेरड्याच्या रोपांचा किंवा मुखवट्यांचा वापर केला जातो.
advertisement
दही-भात: काही ठिकाणी गौरी विसर्जनाच्या वेळी दही-भाताचा नैवेद्य सोबत दिला जातो. गौरी विसर्जनानंतर नदीवरून थोडी वाळू आणून ती घरात ठेवली जाते. हे शुभ मानले जाते आणि काहीजण ही वाळू तिजोरीतही ठेवतात, ज्यामुळे घरात धन-ऐश्वर्य वाढते. गौरी पूजनाच्या वेळी अखंड सौभाग्य आणि दांपत्य सुखासाठी दोरे किंवा गाठी घेण्याची परंपरा आहे.
advertisement
विसर्जनाचे मुहूर्त - गणपती विसर्जन हे दीड, पाच, सात किंवा दहा दिवसांनी केले जाते. गौरी विसर्जन हे साधारणतः गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी केले जाते. विसर्जन हे मूळ नक्षत्रावर शुभ मुहूर्तावर करावे. विसर्जन विधी आणि परंपरा भक्तीभाव आणि श्रद्धेने पार पाडल्या जातात. मात्र, हल्लीच्या काळात पर्यावरणाचा विचार करून गणेश आणि गौरीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे जलप्रदूषण टाळता येते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 02, 2025 12:45 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Gauri-Ganpati Visarjan 2025: बाप्पा चालले गावाला..! घरगुती गौरी-गणपती विसर्जन करताना या गोष्टी चुकवू नका


