Kantara: कांतारा चित्रपटात दाखवलेली देवता नेमकी कोण? रणबीर सिंगला लोकांची मागावी लागली माफी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Kantara: पंजुरली देवता या दक्षिण भारतातील तटीय कर्नाटक, म्हणजेच तुलु नाडू प्रदेशातील लोकसंस्कृती आणि श्रद्धेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. येथे त्यांची पूजा गाव, जंगल आणि शेतीचे रक्षण करणाऱ्या देवता म्हणून केली जाते. पंजुरलीचे रूप वराहासारखे मानले जाते..
मुंबई : कांतारा चित्रपटात दाखवलेल्या पंजुरली देवतेचा रणवीर सिंगने केलेला अपमान लोकांना बिलकूल आवडला नाही. तो देवतेशी संबंधित काही विनोद करायला गेला पण, लोकांना त्याच्या या प्रकाराचा राग आला. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं. प्रचंड लोकांच्या नाराजीमुळे त्याने माफीही मागितली. पंजुरली देवता या दक्षिण भारतातील तटीय कर्नाटक, म्हणजेच तुलु नाडू प्रदेशातील लोकसंस्कृती आणि श्रद्धेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. येथे त्यांची पूजा गाव, जंगल आणि शेतीचे रक्षण करणाऱ्या देवता म्हणून केली जाते. पंजुरलीचे रूप वराहासारखे मानले जाते आणि त्यांचा संबंध भगवान विष्णूंच्या वराह अवताराशी जोडला जातो. तुलु समाजातील भूत कोला या पारंपरिक नृत्य-विधींमध्ये पंजुरलीची आराधना केली जाते, ज्यातून स्थानिक लोक देवतेचे आशीर्वाद आणि संरक्षण मिळवतात.
कर्नाटक आणि केरळातील अनेक भागांत लोकांचा विश्वास आहे की, पंजुरली देवता जंगलांचे, पिकांचे आणि घर-परिवाराचे रक्षण करतात. स्थानिक शेतकरी मानतात की, पिकांना धोका निर्माण झाला किंवा गावावर संकट आले, तर पंजुरली देवता त्यांचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांना ग्रामीण रक्षक देवता असेही म्हटले जाते. हिंदू परंपरेनुसार भगवान विष्णूंचा वराह हा एक महत्त्वाचा अवतार आहे. वराहाने पृथ्वीमातेचे समुद्रातून उद्धार केल्याची कथा प्रचलित आहे. दक्षिण भारतातील लोककथांमध्ये पंजुरलीला हाच वराह अवतार किंवा त्यातून प्रकटलेली दिव्य शक्ती मानले जाते. म्हणूनच लोक त्यांचा आदराने पूजन करतात.
advertisement
पंजुरली देवतेची कथा -
लोककथेनुसार वराहाच्या अनेक पुत्रांपैकी एक लहान आणि कृश बालक होता, जो नेहमी उपाशी राहत असे. देवी पार्वतीने त्याच्यावर दया करून त्याचे पालनपोषण केले. मोठा झाल्यावर तो वराहरूपात अत्यंत सामर्थ्यवान झाला, परंतु त्याच्या स्वभावात उग्रता आली. त्याने लोकांच्या शेतजमिनींचे नुकसान सुरू केले, ज्यामुळे लोक हैराण झाले. भगवान शिव त्याला दंड देणार होते; पण पार्वतीच्या विनंतीवरून त्यांनी त्याला मारण्याऐवजी पृथ्वीवर पाठवले. येथे आल्यावर त्याने मनुष्य आणि पिकांचे रक्षण करणे सुरू केले आणि तेव्हापासून तो पंजुरली देवता म्हणून ओळखला जाऊ लागला.
advertisement
गुलिगा देवता कोण?
कांतारा चित्रपटात आणखी एका देवतेचा उल्लेख आहे - गुलिगा. कथेनुसार, महादेवांपासून उत्पन्न झालेल्या गुलिगाचा स्वभावही अत्यंत उग्र होता. अखेरीस त्यांनाही पृथ्वीवर पाठवण्यात आले, जेणेकरून ते मानवांचे आणि पिकांचे रक्षण करू शकतील. लोकपरंपरेत त्यांनाही महत्त्वाचे रक्षक देवता मानले जाते.
advertisement
भूत कोला परंपरा -
तुलु नाडूतील भूत कोला ही प्राचीन आणि समृद्ध लोकपरंपरा आहे. यात नर्तक पारंपरिक वेशभूषा धारण करून देवतेचे आवाहन करतात. देवता नर्तकात अवतीर्ण होतात, गावकऱ्यांच्या भावना आणि समस्या ऐकतात व त्यांना आशीर्वाद देतात. कांतारा चित्रपटात या परंपरेचे अत्यंत प्रभावी चित्रण केले आहे.
advertisement
एकूणच, पंजुरली आणि गुलिगा या फक्त लोककथांतील व्यक्तिरेखा नाहीत, तर दक्षिण भारताच्या संस्कृतीचे, निसर्गाबद्दलच्या आदराचे आणि लोकांच्या खोल रूजलेल्या श्रद्धेचे प्रतीक आहेत. कांताराने या परंपरेला अधिक व्यापक पातळीवर पोहोचवले आणि तिचे सौंदर्य जगासमोर प्रभावीपणे मांडले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 11:41 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Kantara: कांतारा चित्रपटात दाखवलेली देवता नेमकी कोण? रणबीर सिंगला लोकांची मागावी लागली माफी


