इतका का राग आला? शेजारिणीने डोळ्यात फवारला ब्लॅक स्प्रे, छ.संभाजीनगरमधील घटना
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या घटनेनंतर संबंधित तरुणीला उपचारासाठी एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
छत्रपती संभाजीनगर : शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत झालेल्या किरकोळ वादाचे रूप गंभीर घटनेत बदलले. शाब्दिक बाचाबाचीदरम्यान शेजारीण आणि तिच्या मुलगा-मुलीने तरुणीच्या तोंडावर अचानक काळ्या रंगाचा स्प्रे फवारल्याने तिच्या चेहऱ्याला आणि डोळ्यांना तीव्र आग होऊन गंभीर त्रास झाला. या घटनेनंतर संबंधित तरुणीला उपचारासाठी एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना एन–5 सिडको सावरकरनगर परिसरात रविवारी (25 जानेवारी) दुपारी 3 वाजता घडली.
जान्हवी दिनेश गंगावणे (वय 21, रा. एन–5 सिडको सावरकरनगर) असे जखमी तरुणीचे नाव आहे. जान्हवीने या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. जान्हवी एम्स हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनचे काम करते. ती तिच्या मैत्रिणीसोबत भाड्याच्या रूममध्ये राहत असून रविवारी (25 जानेवारी) दुपारी 3 वाजता सुट्टी असल्याने दोघी घरीच होत्या. जान्हवी खाली गेल्यानंतर खालच्या मजल्यावर राहणाऱ्या सुरेखा मोतीराम थोटे हिला तिने गेट बाहेरून बंद करू नकोस, मला बाहेर जायचे आहे, असे सांगितले. यावरून दोघींमध्ये शाब्दिक वाद झाला. त्याचवेळी सुरेखाच्या घरातून मोठ्या आवाजात गाणी सुरू होती.
advertisement
जान्हवी आणि तिच्या मैत्रिणीने आवाज कमी करण्याची विनंती केली असता, सुरेखा तसेच तिचा मुलगा आणि मुलगी यांनी खिडकी उघडून जान्हवीच्या तोंडावर कुठलातरी काळ्या रंगाचा स्प्रे फवारला. स्प्रे डोळ्यांत गेल्याने जान्हवीच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांत तीव्र जळजळ होऊ लागली. त्यानंतर तिला तातडीने एम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी जान्हवीच्या तक्रारीवरून सिडको पोलिसांनी सुरेखा थोटे आणि तिच्या मुलगा-मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार भानुदास खिल्लारे करत आहेत.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 7:48 PM IST









