विश्वास ठेवला अन् घात झाला! रत्नागिरीतील चिमुकलीचा गोव्यात नरबळी, शेजाऱ्यांचं भयंकर कांड
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime News: नरबळीच्या घटनेनं पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. मूल होत नसल्याच्या कारणातून एका दाम्पत्याने शेजारी राहणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीचा जीव घेतला आहे.
रत्नागिरी: नरबळीच्या घटनेनं पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. मूल होत नसल्याच्या कारणातून एका दाम्पत्याने शेजारी राहणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीचा जीव घेतला आहे. आरोपींनी पीडित मुलीला घरासमोरून गायब केलं, त्यानंतर मांत्रिकांच्या सांगण्यावरून तिचा भयावह पद्धतीने जीव घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी दाम्पत्याला अटक केली आहे.
ही घटना गोव्यातील कसलये तिस्क फोंडा परिसरात घडली आहे. अमेरा अन्वारी असं मयत चिमुरडीचं नाव आहे. घरा शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याने निर्घृपणे हत्या करत अमेराचा जीव घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मुळची रत्नागिरीची रहिवासी आहे. येथील एका युवकासोबत तिचा विवाह झाला होता. या लग्नापासून त्यांना दोन मुलं झाली होती. पण लग्नानंतर पतीने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. पतीच्या जाचाला कंटाळून तक्रारदार महिला गोव्यातील कसलये तिस्क फोंडा परिसरात राहायला आली.
advertisement
2024 पासून त्या आपल्या दोन मुलांसह याच परिसरात राहत होत्या. इथं अन्वारी यांच्या शेजारी अलाट नावाचं परप्रांतीय कुटुंब राहत होतं. या कुटुंबासोबत तक्रारदार महिलेचं चांगलं जमत होतं. दोन्ही कुटुंबात घरगुती संबंध होते. पण याच विश्वासातील दाम्पत्याकडून मुलीची हत्या होईल, याची जराही कल्पना तक्रारदार महिलेला नव्हती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या अलाट दाम्पत्याच्या लग्नाला 20 वर्षे झाली होती. तरी त्यांना मूल झाले नव्हते. पप्पू आणि पूजा अशी त्या पती पत्नीची नावं आहेत. मुलबाळ होत नसल्यामुळे ते निराश झाले होते. घरात सुबत्ता नांदावी आणि मुलं व्हावं यासाठी ते एका मांत्रिकाकडे गेले होते. तेव्हा मांत्रिकाने नरबळी देण्यास सांगितलं.
advertisement
यातूनच शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याने अमेराचा बळी देण्याचं ठरवलं. बुधवारी ५ मार्चला अचानक अमेरा बेपत्ता झाली. मुलगी कुठेच सापडत नाही म्हणून अमेराच्या आईने फोंडा पोलिसांत तक्रार दिली. पोलीस तिचा शोध घेत होते. पोलिसांनी शेजाऱ्यांचीही चौकशी केली. यावेळी आरोपी पप्पू गोंधळलेल्या अवस्थेत दिसला. पोलिसांनी गुरुवारी त्याची पुन्हा चौकशी केली. तेव्हा आरोपीच्या बोलण्यात विसंगती आढळल्या. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा त्याने मांत्रिकाच्या सांगण्यावरून अमेराचा नरबळी देऊन घराशेजारीच तिचा मृतदेह गाडल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला.
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
March 10, 2025 1:22 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
विश्वास ठेवला अन् घात झाला! रत्नागिरीतील चिमुकलीचा गोव्यात नरबळी, शेजाऱ्यांचं भयंकर कांड