पैशांचा पाऊस पडला पण..! डबल पैशांच्या नादात 12 लाखांना चुना, बीडच्या तिघांना कसं लुटलं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Money Rain: पैशांचा पाऊस पडून डबल पैसे करण्याच्या नादात बीडच्या तिघांची फसवणूक झालीये. जालन्यातील एका मांत्रिकाने त्यांना गंडा घातला.
जालना: झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकजण कंगाल झाल्याचे आपण वाचले असेल. असाच काहीसा प्रकार बीडमधील तिघांच्या बाबतीत घडलाय. पैसे डबल करण्याच्या नादात लाखोंची फसवणूक झालीये. पैशांचा पाऊस पाडतो असं सांगून जालना तालुक्यातील इंदेवाडीच्या मांत्रिकाने 12 लाख उकळले. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात हा प्रकार घडला असून याप्रकरणी जालना पोलिसांत तक्रार करण्यात आलीये.
पैशाचा पाऊस..
जालना शहरातील इंदेवाडी भागातील सिद्धार्थनगरातील एक व्यक्ती घरात पैशांचा पाऊस पाडून पैसे दुप्पट करून देतो, अशी माहिती मिळाली होती. यावर विश्वास ठेवून बीडमधील बदामराव किसनराव नलवडे (55), भागवत रावसाहेब देवडे (42) आणि संदीप सुनील भोसले (33) यांनी 28 ऑक्टोबर 2024 रोजी सिध्दार्थनगर येथील त्या व्यक्तीचे घर गाठले. त्याला 11 लाख 70 हजार रुपये रोख व 30 हजार रुपये फोनपेवरून दिले. त्यानंतर याने घरात पैशांचा पाऊस पाडला व पैशांची गोणी भरून दिली. परंतु, सदर गोणी घेऊन आम्हाला कुणालाच बाहेर पडता आले नाही, असे तक्रारीत म्हटलेय.
advertisement
फसवणुकीचा गुन्हा
काहीतरी जादूटोणा केल्यामुळे आम्हाला तिथून रिकाम्या हाताने यावे लागले. अंधश्रध्दा दाखवून आमची 12 लाखांची फसवणूक केली, असेही या तिघांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पैशाचा पाऊस पाडतो म्हणून फसवणुकीचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. यात जालन्यातील मांत्रिकाने पुण्यातील एका व्यापाऱ्यास 52 लाख रुपयांचा गंडा घातला होता. तर दोन महिन्यापूर्वीच एका माजी सैनिकालाही असेच फसविण्यात आले होते.
advertisement
तक्रार संशयास्पद?
view commentsफसवणूकीच्या संदर्भात अशी तक्रार आली असल्याचे तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी म्हटले आहे. यात तक्रार देणाऱ्यांना प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. मात्र ते समोर आले नाहीत. दिलेली तक्रार संशयास्पद वाटत असली तरी या अनुषंगाने आम्ही चौकशी करतो आहोत, असे उनवणे यांनी सांगितले.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
March 29, 2025 10:32 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पैशांचा पाऊस पडला पण..! डबल पैशांच्या नादात 12 लाखांना चुना, बीडच्या तिघांना कसं लुटलं?


