दरोड्याचा बनाव रचला, पण कीर्तनकार फसला; कर्जाचा विळखा ते पत्नीचा खून, संपूर्ण घटनाक्रम, Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Kolhapur Crime: कोल्हापुरात एका कीर्तनकारानेच पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडलीये. कर्जबाजारापणामुळे पत्नीला संपवल्याचे तपासातून पुढे आले आहे.
कोल्हापूर: आजरा तालुक्यातील मडिलगे गावात एका खळबळजनक घटनेने संपूर्ण पंचक्रोशी हादरली आहे. पूजा सुशांत गुरव या एका विवाहितेच्या खुनाचा गुंता पोलिसांनी अवघ्या 24 तासांत उलगडला, मात्र यात पोलिसांना एक धक्कादायक बाब समोर आली. हा खून दरोडेखोरांनी नव्हे, तर पूजाचा पती सुशांत सुरेश गुरव यानेच केल्याचे तपासात उघड झाले. विशेष म्हणजे सुशांत हा कीर्तनकार आणि प्रवचनकार म्हणून परिचित आहे.
कीर्तनकार सुशांतचा काळा चेहरा
सुशांत गुरव हा मडिलगे गावातील एक सुपरिचित आणि आदरणीय व्यक्ती होता. गावातील सामाजिक कार्यात तो हिरिरीने सहभागी होत असे. गोरगरिबांच्या सुख-दु:खात तो नेहमीच पुढे असायचा आणि आचाऱ्याचे काम विनामूल्य करायचा. गावातील विठ्ठल मंदिरात हरिनाम सप्ताहाच्या आयोजनात त्याचा मोठा वाटा होता. या धार्मिक उपक्रमामुळे गावातील तरुणाईसह आबालवृद्धांमध्ये त्याचा बोलबाला होता. कीर्तनकार आणि प्रवचनकार म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली होती. त्याच्या प्रवचनांमधून तो लोकांना आनंदी आणि नीतिमान जीवन जगण्याचा संदेश द्यायचा. परंतु, त्याच सुशांतने आपल्या पत्नीचा खून करावा, यावर गावकऱ्यांचा विश्वास बसत नाही.
advertisement
कर्जाच्या विळख्यातून खुनापर्यंत
सुशांत आणि पूजा गुरव या दाम्पत्याला दीड वर्षांपूर्वी सोपान आणि मुक्ताई ही जुळी बाळं झाली. सुशांतने आपल्या धार्मिक प्रवृत्तीनुसार या मुलांना संत परंपरेनुसार नावे दिली होती. परंतु, आर्थिक संकटाने त्याला ग्रासले होते. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या सुशांतने पूजाला तिचे दागिने देण्यास सांगितले, जेणेकरून कर्ज फेडता येईल. परंतु, पूजाने यास स्पष्ट नकार दिला. यातूनच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, सुशांतने शांत डोक्याने पत्नीचा धारदार हत्याराने खून केला. या क्रूर कृत्याने एका सुखी कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला.
advertisement
पोलिसांनी 24 तासांत उलगडला खुनाचा गुंता
सुशांतने रविवारी पहाटे 2:30 वाजता आजरा पोलिस ठाण्यात खोटी फिर्याद दिली होती की, घरात दरोडा पडला असून, दरोडेखोरांनी पूजाचा खून करून सोने आणि रोख रक्कम लंपास केली. या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. आजरा पोलिस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांत या खुनाचा उलगडा केला. सुशांतने दरोडेखोरांनी पूजाच्या डोक्यात रॉडने वार केल्याचे सांगितले होते, परंतु पोलिस तपासात धारदार हत्याराने खून झाल्याचे उघड झाले.
advertisement
मृतदेहावरील मंगळसूत्र, बांगड्या आणि कपाटातील दागिने तसेच होते. साड्या विस्कटल्या होत्या, परंतु त्यावर रक्ताचे डाग नव्हते. सुशांतच्या माहितीत विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय त्याच्यावर गेला. सखोल चौकशीत सुशांतने गुन्ह्याची कबुली दिली, आणि मडिलगेचा माजी उपसरपंच सुशांत सुरेश गुरव याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे हा गुन्हा त्वरित उघडकीस आला.
सुशांतचे व्यवसाय आणि कर्जबाजारीपणा
सुशांतने आयटीआयचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्षे एका खासगी साखर कारखान्यात आणि सूतगिरणीत नोकरी केली. याच काळात त्याने आपल्या आचारी असलेल्या वडिलांकडून शाकाहारी आणि मांसाहारी स्वयंपाकाचे कौशल्य आत्मसात केले. त्यानंतर त्याने केटरिंगचा व्यवसाय सुरू केला, ज्यातून त्याने 50 लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिला. परंतु, आई आणि पत्नीवरील औषधोपचाराचा खर्च आणि चंगळवादामुळे तो कर्जबाजारी झाला. त्याच्या निव्यर्सनी आणि धार्मिक स्वभावामुळे लोकांना त्याच्यावर विश्वास होता, परंतु आर्थिक संकटाने त्याला या टोकाच्या कृत्याकडे ढकलले.
advertisement
बाळांची जबाबदारी कोण घेणार?
या खुनाच्या घटनेने सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे सोपान आणि मुक्ताई या दोन लहान मुलांची जबाबदारी कोण घेणार? सुशांतची बहीण मडिलगे गावात राहते, तर पूजाची सासुरवाडी अतिग्रे येथे आहे. पुंद्रा येथे सुशांतच्या वडिलांची बहीण आहे. परंतु, या दोन चिमुकल्यांची आयुष्यभराची जबाबदारी घेण्यास कोण तयार होणार, हा प्रश्न गुरव कुटुंबीयांसमोर उभा आहे. गावकऱ्यांमध्येही याबाबत चर्चा सुरू आहे.
advertisement
गावकऱ्यांमध्ये शोक आणि संताप
view commentsकीर्तन आणि प्रवचनांमधून दुसऱ्यांना आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणारा सुशांत स्वत:च्या आयुष्यातील संकटांना सामोरे जाऊ शकला नाही, आणि त्याने पत्नीचा खून करून सर्वांना धक्का दिला. या घटनेने मडिलगे गावात शोक आणि संताप आहे. सुशांतच्या कृत्याने गावकऱ्यांचा विश्वास तुटला आहे. जो माणूस गावातील सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर होता, त्यानेच असा क्रूर गुन्हा करावा, यावर गावकऱ्यांचा विश्वास बसत नाही. पूजाच्या खुनाने एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे, आणि गावातील सामाजिक वातावरणावरही याचा परिणाम झाला आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
May 21, 2025 10:25 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
दरोड्याचा बनाव रचला, पण कीर्तनकार फसला; कर्जाचा विळखा ते पत्नीचा खून, संपूर्ण घटनाक्रम, Video