नटुन थटून नाट्य संमेलनाला आले, पण पत्ता सापडेना, चालले परत मुंबईला; अभिनेत्री संतापली
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
पुण्यात अतिशय भव्यदिव्य असे नाट्य संमेलन होत असताना नाट्य संमेलन ठिकाणाचा पत्ताच सापडत नसल्याची तक्रार जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून केली आहे.
पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे होणाऱ्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित शतक महोत्सवी नाट्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये होत असलेल्या या संमेलनाला मराठी नाट्यसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी हजेरी लावत असून येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत. परंतु पुण्यात अतिशय भव्यदिव्य असे नाट्य संमेलन होत असताना नाट्य संमेलन ठिकाणाचा पत्ताच सापडत नसल्याची तक्रार जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून केली आहे.
शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे नगरीत नाट्य कलेचा जागर होत असतानाच पहिल्या दिवशी चिंचवड परिसरातून नाट्य कलावंतांसोबत पारंपरीक लोककला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोक कलाकारांच्या लोककलेने नाट्य दिंडी काढण्यात आली होती. या नाट्य दिंडीत अनेक नाट्यसृष्टीतील तसेच मराठी चित्रपट, मालिका सृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती.
रविवारी 7 जानेवारी रोजी देखील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम देखील पार पडला. पुण्यात इतका भव्य कार्यक्रम होत असतानाच जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमाचे स्थळ सापडल नसल्याची नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली.
advertisement
त्या म्हणाल्या, " पुण्यात होत असलेल्या 100 व्या नाट्य संमेलनासाठी मी मुंबईहून पुण्याला आले होते. परंतु बराचकाळ फिरूनही मला नाट्य संमेलनाचं स्थळ काही सापडलं नाही. मला नाट्य संमेलनाचा कार्यक्रम होत असलेला मंडप कुठेही दिसला नाही. मी नटून थटून या कार्यक्रमासाठी आले होते पण मला तेथे ज्या कार्यक्रमासाठी जायचे होते त्याची वेळ होऊ गेली आणि पत्ता न सापडल्याने मी तेथे वेळेत पोहोचू शकली नाही. तेव्हा मी शेवटी परत मुंबईला निघाले आहे".
advertisement
वंदना गुप्ते या जेष्ठ अभिनेत्री असून त्यांनी मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. हरवलेल्या पत्त्यांचा बंगला हे सध्या त्यांचं सुरु असलेलं लोकप्रिय नाटक आहे, यासह काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट बाईपण भारी देवा यात देखील त्या मुख्य भूमिकेत होत्या. वंदना गुप्ते यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 07, 2024 8:55 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
नटुन थटून नाट्य संमेलनाला आले, पण पत्ता सापडेना, चालले परत मुंबईला; अभिनेत्री संतापली