महेश मांजरेकरांकडून राज ठाकरेंना आग्रहाचं निमंत्रण, घेतली खास भेट, समोर आलं कारण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mahesh Manjrekar-Raj Thackeray Meet : महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांनी ठाकरेंना एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी खास आमंत्रण दिलं आहे.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचे मोठे नाव दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत. त्यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ही भेट त्यांच्या आगामी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी खास आमंत्रण देण्यासाठी होती.
'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'चा वारसा, राज ठाकरेंच्या हाती ट्रेलर!
महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना त्यांच्या आगामी चित्रपट 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' याच्या ट्रेलर प्रकाशन कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतली. २००९ मध्ये आलेल्या 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या सुपरहिट चित्रपटाचा हा सिक्वेल आहे, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन मांजरेकर यांनीच केले आहे.
advertisement
मांजरेकरांनी राज ठाकरेंना आमंत्रण देण्यामागचे कारण स्पष्ट आहे. राज ठाकरे हे मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नेहमीच कणखर भूमिका घेतात. त्यामुळे आजच्या महाराष्ट्रातील ज्वलंत समस्यांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर त्यांच्या हस्ते प्रकाशित व्हावा, अशी मांजरेकरांची इच्छा आहे.
advertisement
छत्रपती शिवाजी महाराजांचा आजच्या काळातील प्रखर अवतार
या चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला टीझर खूप गाजला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजवर न पाहिलेले असे प्रखर रूप दिसणार आहे. मराठीची अस्मिता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मराठी माणसाचे मुंबईतील स्थान आणि परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक गंभीर विषयांवर महाराज बोलताना आणि कृती करताना दिसणार आहेत. हा चित्रपट केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव न करता, आजच्या महाराष्ट्राशी आणि त्याच्या अनुत्तरित प्रश्नांशी थेट संवाद साधत असल्याचे टीझरवरून स्पष्ट होते.
advertisement
चित्रपटाची स्टारकास्ट आणि प्रदर्शनाची तारीख
या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिकेत असून, त्याच्यासोबत विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई अशा अनेक कसलेल्या कलाकारांची फौज आहे. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'झी स्टुडिओज'ने प्रस्तुत केलेला हा चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 8:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
महेश मांजरेकरांकडून राज ठाकरेंना आग्रहाचं निमंत्रण, घेतली खास भेट, समोर आलं कारण