Pune : पुण्याच्या रस्त्यावर दहशत, 5 वर्षांच्या शिवश्रीवर जीवघेणा हल्ला, भीतीने पालकांची झोप उडाली
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
5 वर्षांच्या शिवश्री साळुंकेवर पुण्याच्या रस्त्यावर जीवघेणा हल्ला झाला, या हल्ल्यात शिवश्रीच्या हातीची बोटे पूर्णपणे कापली गेली. या हल्ल्यानंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
पुणे : 5 वर्षांच्या शिवश्री साळुंकेवर पुण्याच्या रस्त्यावर जीवघेणा हल्ला झाला, या हल्ल्यात शिवश्रीच्या हातीची बोटे पूर्णपणे कापली गेली, त्यानंतर पुना हॉस्पिटलमध्ये शिवश्रीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून बोटे तिच्या हाताला पुन्हा जोडण्यात आली आहेत. पुण्याच्या मांजरी बुध येथे राहणारी शिवश्री 30 सप्टेंबर रोजी आई आणि तिच्या जुळ्या बहिणीसोबत घरी जात होती.
शिवश्री बिल्डिंगमध्ये प्रवेश करत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्या बोटावर हल्ला केला. यानंतर शिवश्रीची आई तिथे आली आणि तिने कुत्र्याला हाकललं, त्यामुळे कुत्रा तिथून निघून गेला. शिवश्री खूप घाबरली होती, बराच वेळ तीचं रडणं थांबत नव्हतं. पण आता तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे, त्यामुळे आता तिला डिस्चार्ज मिळत आहे, अशी प्रतिक्रिया शिवश्रीचे वडील अनिल यांनी दिली आहे.
advertisement
पूना रुग्णालयातील मायक्रोव्हस्क्युलर आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. अभिषेक घोष यांनी कापलेल्या बोटाचे तातडीचे मायक्रोसर्जिकल रिप्लांटेशन केले. चार तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या प्रक्रियेदरम्यान, हाडे दुरुस्त करण्यात आली आणि सूक्ष्मदर्शकाखाली लहान रक्तवाहिन्या आणि नसा पुन्हा जोडण्यात आल्या, ज्यामुळे बोटाला रक्ताभिसरण आणि कार्य यशस्वीरित्या पुनर्संचयित झाले.
'कुत्र्याने बोटांवर केलेला हल्ला इतका भीषण होता, की आम्हाला स्पष्टपणे कट दिसत नव्हता, त्यामुळे शस्त्रक्रिया करणं खूपच कठीण होतं. तसंच रेबीजच्या भीतीमुळे धोका आणखी वाढला होता', अशी प्रतिक्रिया डॉ. घोष यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.
advertisement
वर्षभरात 20 हजार प्रकरणं
महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत कुत्र्यांच्या चाव्याच्या सुमारे 20 हजार प्रकरणांची नोंद झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की सप्टेंबर महिन्यातील कुत्र्यांच्या चाव्याच्या प्रकरणांचा डेटा अद्याप गोळा करणे बाकी आहे. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कुत्र्यांच्या चाव्याच्या अशा घटनांनंतर, लसीकरण त्वरित केले जाते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 06, 2025 8:34 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : पुण्याच्या रस्त्यावर दहशत, 5 वर्षांच्या शिवश्रीवर जीवघेणा हल्ला, भीतीने पालकांची झोप उडाली