थिएटरमधून चित्रपट काढला, तर लावला अजब जुगाड! 'कुर्ला टू वेंगुर्ला' साठी प्रेक्षकांनी काय केलं एकदा पाहाच
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Marathi Movie Kurla to Vengurla : दक्षिणेकडील 'कांतारा' हा मोठा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चांगला चालत असलेला 'कुर्ला टू वेंगुर्ला' जवळपास सर्वच चित्रपटगृहांमधून काढण्यात आला.
मुंबई : माती आणि नात्यांची गोष्ट सांगणारा, समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांचीही मनं जिंकणारा 'कुर्ला टू वेंगुर्ला' हा चित्रपट १९ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. एका लोकचळवळीतून तयार झालेल्या या सिनेमाने चित्रपटगृहांमध्ये चांगली गर्दी खेचली होती. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी याला 'जागतिक पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा सिनेमा', तर ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी 'कलेच्या बजबजपुरीत वाजणारं खणखणीत नाणं' असा गौरव केला होता.
चांगला चाललेला सिनेमा अचानक गायब!
'माऊथ पब्लिसिटी'मुळे हा चित्रपट हळूहळू जोर धरत होता, पण त्याचवेळी दक्षिणेकडील 'कांतारा' हा मोठा चित्रपट प्रदर्शित झाला. याचा परिणाम म्हणून चांगला चालत असलेला 'कुर्ला टू वेंगुर्ला' जवळपास सर्वच चित्रपटगृहांमधून काढण्यात आला. मराठी चित्रपटांना बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांसमोर मिळणारे दुय्यम स्थान हा काही नवीन विषय नाही, पण या सुंदर चित्रपटाबाबतीतही तेच घडले. सध्या गोरेगावमधील 'मूव्हीटाईम हब' या थिएटरमध्ये या चित्रपटाचा फक्त एक शो सुरू आहे, पण विशेष म्हणजे, तोही शो प्रत्येक दिवशी हाउसफुल चालत आहे!
advertisement
प्रेक्षकांनीच केली कमाल
कोणत्याही मोठ्या व्यक्तीचे किंवा कॉर्पोरेटचे पाठबळ नसलेल्या या सिनेमाने तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांना खेचून आणले, पण थिएटर मिळत नसल्याचे पाहून प्रेक्षकांनी अक्षरशः कमाल केली. वेंगुर्लेकरांनी ठरवले की, जर थिएटरमध्ये शो मिळत नसतील, तर थेट नाट्यगृहात शो लावायचे!
advertisement
वेंगुर्ल्यातील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात या चित्रपटाचे दोन शो लावण्यात आले आणि बघता बघता ते दोन्ही शो हाउसफुल झाले. लोकांची मागणी इतकी वाढली की, निर्मात्यांना एका दिवसात चार शो लावावे लागले आणि हे चारही शो काही मिनिटांतच भरले! रसिक प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला आहे, हेच यातून सिद्ध झाले.
advertisement
मुलांची न होणारी लग्न आणि शहरांचे आकर्षण यांसारख्या विषयांवर भाष्य करणारा हा सिनेमा केवळ मनोरंजन करत नाही, तर अंतर्मुख करतो. यानंतर मराठी चित्रपट चालत नाहीत, असे म्हणणाऱ्यांना लेखक अमरजीत आमले आणि दिग्दर्शक विजय कलमकर यांनी अप्रत्यक्षपणे खणखणीत उत्तर दिले आहे.
वैभव मांगले, सुनील तावडे, वीणा जामकर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला आता खऱ्या अर्थाने लोकाश्रयाची गरज आहे. ग्लोबल कोकण, मराठी एकीकरण समिती अशा संघटनांनी या चित्रपटामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मराठी कलाकारांसह राज्यकर्त्यांनीही या अस्सल महाराष्ट्राच्या मातीतल्या चित्रपटामागे ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 6:59 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
थिएटरमधून चित्रपट काढला, तर लावला अजब जुगाड! 'कुर्ला टू वेंगुर्ला' साठी प्रेक्षकांनी काय केलं एकदा पाहाच