भारतात प्रथमच आढळला 'हा' पक्षी, तोही चिपळूणमध्ये! छत्रीसारखे पंख पसरून करतो माशांची शिकार, पण आला कुठून?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
चिपळूणच्या पाणथळ परिसरात नुकताच एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक पक्षी दिसून आला आहे. पक्षी निरीक्षक डॉ. श्रीधर जोशी यांच्या नजरेतून दोन...
चिपळूण : चिपळूणच्या पाणथळ परिसरात नुकताच एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक पक्षी दिसून आला आहे. पक्षी निरीक्षक डॉ. श्रीधर जोशी यांच्या नजरेतून दोन काळ्या बगळ्यांचा 'ब्लॅक हेरॉन' (Black Heron - Egretta ardesiaca) हा भारतात आजवर न दिसलेला पक्षी प्रथमच आढळून आल्याची नोंद झाली आहे. हा पक्षी थेट आफ्रिकेतून चिपळूणमध्ये आल्याने पक्षी अभ्यासकांच्या दृष्टीने हे एक ऐतिहासिक स्थलांतर मानले जात आहे.
'कॅनोपी फिडींग'ची अनोखी शैली
डॉ. जोशी यांना रविवारी (3 ऑगस्ट) सकाळी एका पाणथळ जागी दोन काळे बगळे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मासे पकडताना दिसले. त्यांनी त्वरित कॅमेऱ्यात हे क्षण टिपले आणि घरी आल्यावर त्याचा सखोल अभ्यास केला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, जगात 'कॅनोपी फिडींग' (Canopy Feeding) किंवा 'अंब्रेला फिडींग' (Umbrella Feeding) नावाची अनोखी मासे पकडण्याची शैली केवळ ब्लॅक हेरॉन या आफ्रिकन पक्ष्यातच दिसून येते. हा पक्षी आपले पंख अर्धवर्तुळात पसरवतो, ज्यामुळे माशांना सावलीखाली आकर्षित करून तो त्यांना सहज पकडतो.
advertisement
लांब पाय, संपूर्ण काळे शरीर आणि 'कॅनोपी फिडींग'ची खास शैली या वैशिष्ट्यांमुळे हा पक्षी 'ब्लॅक हेरॉन' असल्याचे आढळले. डॉ. जोशी यांनी ही माहिती आणि छायाचित्रे 'इंडियन बर्ड जर्नल'कडे पाठवली असून, भारतात या पक्ष्याची ही पहिलीच अधिकृत नोंद असल्याचे प्राथमिक संकेत आहेत.
आफ्रिकेतून चिपळूणमध्ये कसा आला?
ब्लॅक हेरॉन हा मुख्यतः पश्चिम आणि दक्षिण आफ्रिकेत आढळणारा पक्षी आहे. सेनेगल, सुडान, केनिया, तंझानिया, मोझांबिक आणि मॅडागास्कर हे त्याचे नैसर्गिक अधिवास आहेत. युरोपमध्येही काही अपवादात्मक नोंदी आहेत, मात्र भारतात आजवर या पक्ष्याचा एकही ठोस पुरावा मिळालेला नव्हता. हा पक्षी सहसा स्थलांतर करत नाही, केवळ अन्नपाण्याची कमतरता असल्यास तो परिसर बदलतो. त्यामुळे त्याचे चिपळूणमध्ये अचानक झालेले आगमन पक्षी अभ्यासकांसाठी एक मोठे गूढ बनले आहे. डॉ. श्रीधर जोशी यांनी सांगितले, "आफ्रिकेतील हे पक्षी चिपळूणमध्ये कसे आले, याचे उत्तर सध्या तरी गूढच आहे. गेल्या आठवड्यापासून मी ते पुन्हा पाहण्यासाठी विविध पाणथळ ठिकाणी शोध घेत आहे."
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 06, 2025 11:24 AM IST
मराठी बातम्या/कोकण/
भारतात प्रथमच आढळला 'हा' पक्षी, तोही चिपळूणमध्ये! छत्रीसारखे पंख पसरून करतो माशांची शिकार, पण आला कुठून?









