प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच, एसटीचं स्टेअरिंग मद्यधुंद चालकाच्या हाती; ...तर घडला असता मोठा अपघात
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
एसटी बस प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. खेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
रत्नागिरी, चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी : एसटी बस प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. जिल्ह्यातील खेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्लॅटफॉर्मवर एसटी बस आणताना चालकानं ती बस बसस्थानकाच्या भिंतीला धडकवली. या अपघातानंतर चालक बसच्या खाली उतरला असता तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचं तेथील प्रवाशांच्या लक्षात आलं. ही गोष्ट वेळीच प्रवाशांच्या लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. ही बस खेडहून बोरिवलीला येणार होती. जर अपघात झाला नसता तर मद्यधूंद अवस्थेत त्याच चालकानं ही बस चालवली असती, त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता होती. या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. खेडवरून रात्री साडेदहा वाजता बोरिवलीसाठी बस सुटते. या बसची वाट पाहात प्रवासी थांबले होते. तितक्यात ही बस आली, मात्र चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि त्याने बस तेथील पिलरला धडकवली. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
advertisement
बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं लक्षात येताच प्रवाशी संतप्त झाले. संतप्त प्रवाशांनी घडलेल्या प्रकारामुळे स्थानक प्रमुखांना घेराव घालत जाब विचारला. या घटनेनंतर संबंधित चालक काही काळ घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती खेड पोलिसांनाही देण्यात आली. पोलिसांनी या चालकाला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर या गाडीसाठी दुसऱ्या चालकाची व्यवस्था करून बस रवाना करण्यात आली.
Location :
Ratnagiri,Ratnagiri,Maharashtra
First Published :
February 01, 2024 12:46 PM IST
मराठी बातम्या/कोकण/
प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच, एसटीचं स्टेअरिंग मद्यधुंद चालकाच्या हाती; ...तर घडला असता मोठा अपघात


