सुनेत्रा पवारांच्या नावाला होकार पण राष्ट्रवादीची ती एक अट भाजपला मान्य नाही! मोठी माहिती समोर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अजित पवार यांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व आणि नेतृत्वाचा प्रश्न उभा ठाकलेला असताना आणि पक्षातूनही बरेच मतप्रवाह समोर येत असताना सुनेत्रा पवार यांनी धीटपणे समोर येऊन उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यास होकार दिलेला आहे.
राहुल झोरी, प्रतिनिधी, मुंबई: अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांची उपमुख्यमंत्रिपदाची जागा कोण घेणार? त्यांच्याकडचे अर्थखाते कुणाकडे जाणार? अशा चर्चा वेगाने सुरू आहेत. नेता निवडीसंदर्भात राष्ट्रवादीच्या आमदारांची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन उद्याच संध्याकाळी त्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे कळते. राष्ट्रवादी जो निर्णय घेईल त्या निर्णयामागे भारतीय जनता पक्ष उभा असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. असे असले तरी अजित पवार यांच्याकडील अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीला देण्यास भाजप तयार नसल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
अजित पवार यांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व आणि नेतृत्वाचा प्रश्न उभा ठाकलेला असताना आणि पक्षातूनही बरेच मतप्रवाह समोर येत असताना सुनेत्रा पवार यांनी धीटपणे समोर येऊन उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यास होकार दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून अजित पवार यांच्याकडील खाती पक्षाकडेच ठेवण्यात यावी, अशी विनंती केली होती. मात्र अर्थखात्यासंदर्भात राष्ट्रवादीची अट भारतीय जनता पक्षाला मान्य नसल्याचे समजते.
advertisement
अर्थखाते राष्ट्रवादीला देण्यास भाजपचा नकार, सूत्रांची माहिती
सरकारमधील ज्या पक्षाकडे अर्थखाते असते, तो पक्ष व्यवस्थित वेग पकडतो, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकार आणि महायुतीच्या सरकारमध्ये हट्टाने अर्थखाते आपल्याकडे मागून घेतले. भाजपच्या साथीला जाताना अर्थखाते आणि पुण्याचे पालकमंत्रिपद घेऊनच त्यांनी सरकारमध्ये प्रवेशासंदर्भात निर्णय घेतले. मात्र आता अजित पवार यांच्या माघारीनंतर अर्थखाते राष्ट्रवादीकडे न ठेवता भाजप ते आपल्याकडे घेणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
advertisement
अर्थसंकल्प कोण मांडणार? फडणवीस म्हणाले, मीच प्रक्रिया पूर्ण करणार
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? असा प्रश्न विचारला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे या प्रश्नाचे उत्तर दिले. अजित पवार यांनी अर्थसंकल्पाचे बरेचसे काम केले होते. उर्वरित कामात मी जातीने लक्ष घालून प्रक्रिया पूर्ण करेल, असे म्हणत अर्थसंकल्प स्वत: मांडणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्याचवेळी अर्थखातेही आपल्याकडेच ठेवणार असल्याचे सूचक संकेत त्यांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 9:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सुनेत्रा पवारांच्या नावाला होकार पण राष्ट्रवादीची ती एक अट भाजपला मान्य नाही! मोठी माहिती समोर










