Health Tips In Marathi: झोप पूर्ण नसल्यास चिडचिड अन् थकवा, मग झोपेचे योग्य गुपित काय? Video
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
झोप ही प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची गरज आहे. दिवसभर काम करून थकलेल्या शरीराला आणि मेंदूला विश्रांती देण्यासाठी पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते.
बीड: झोप ही प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची गरज आहे. दिवसभर काम करून थकलेल्या शरीराला आणि मेंदूला विश्रांती देण्यासाठी पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते. झोपेमुळे मेंदू नव्याने कार्यक्षम होतो, स्मरणशक्ती सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटासाठी झोपेचे योग्य तास महत्त्वाचे आहेत. प्रौढ व्यक्तींनी दररोज 7 ते 8 तासांची झोप घेणे आरोग्यासाठी उपयुक्त आहे, असं डॉक्टर अपर्णा बोरचाटे सांगतात.
योग्य झोपेचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर दिसून येतो. डॉक्टर बोरचाटे सांगतात की झोप पूर्ण नसल्यास चिडचिड, तणाव, लक्ष केंद्रीकरणात अडथळा, तसेच थकवा जाणवतो. झोपेचा अभाव दीर्घकाळ राहिल्यास हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या गंभीर आजारांची शक्यता वाढते. म्हणून दररोज ठराविक वेळेवर झोपेची सवय ठेवणे आवश्यक आहे.
advertisement
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना झोप न लागण्याची समस्या भेडसावत आहे. यामागील प्रमुख कारणे म्हणजे मानसिक तणाव, सतत मोबाईलचा वापर, कामाचा अतिरिक्त ताण आणि चुकीची जीवनशैली. डॉक्टर अपर्णा बोरचाटे यांच्या म्हणण्यानुसार, झोप न लागल्यामुळे मेंदूला विश्रांती मिळत नाही आणि त्यामुळे मानसिक थकवा वाढतो. परिणामी दुसऱ्या दिवशी कामात मन लागत नाही आणि एकाग्रता कमी होते.
advertisement
झोप न लागल्यास काही सोपे उपाय केल्यास फायदा होऊ शकतो. डॉक्टर बोरचाटे यांचा सल्ला आहे की, झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्हीचा वापर कमी करावा. गरम दूध पिणे, हलके ध्यान करणे किंवा शांत संगीत ऐकणे मन शांत करण्यास मदत करते. झोपण्यासाठी नेहमी स्वच्छ, अंधार आणि शांत खोली तयार करावी. झोपेचे ठराविक वेळापत्रक पाळल्यास शरीराला सवय लागते.
advertisement
तरीही झोपेची समस्या कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर अपर्णा बोरचाटे यांच्या मते, झोपेच्या गोळ्या स्वतःच्या मनाने घेणे टाळावे कारण त्यामुळे सवय लागू शकते. नैसर्गिक पद्धतीने झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त दिनचर्या ठेवणे महत्त्वाचे आहे. योग्य झोप हीच निरोगी आयुष्याचे गुपित असल्याचे डॉक्टर बोरचाटे स्पष्टपणे सांगतात.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Jun 23, 2025 5:37 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips In Marathi: झोप पूर्ण नसल्यास चिडचिड अन् थकवा, मग झोपेचे योग्य गुपित काय? Video








