रात्री तहान लागून तुमची झोपमोड होते का? दुर्लक्ष करू नका 'ही' असू शकतात कारणं
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
पाणी पिणं चांगलं असलं, तरी दररोज रात्री तहान लागली आणि झोप मोडून पाणी प्यावं लागलं तर ती सवय चांगली नाही. त्याचं काय कारण असतं, हे समजून घेतलं तर ती सवय मोडणं सोपं ठरू शकतं.
रात्रीची शांत झोप हे उत्तम आरोग्याचं लक्षण असतं. दिवसभर थकलेल्या शरीराला व मनाला रात्रीच्या झोपेमुळे आराम मिळतो. सर्वसाधारणपणे सलग 7 ते 8 तास झोप घ्यावी असा डॉक्टर सल्ला देतात; पण काही कारणांमुळे झोप अर्धवट होते. काही जणांना रात्री तहान लागते. रोज रात्री उठून त्यांना पाणी प्यावं लागतं. बरेचदा घसा कोरडा पडतो, घाम येतो व उठून पाणी प्यायल्याशिवाय बरं वाटत नाही. पाणी पिणं चांगलं असलं, तरी दररोज रात्री तहान लागली आणि झोप मोडून पाणी प्यावं लागलं तर ती सवय चांगली नाही. त्याचं काय कारण असतं, हे समजून घेतलं तर ती सवय मोडणं सोपं ठरू शकतं.
जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे आहार आणि विश्रांतीच्या सवयींमध्येही बदल झालाय. याचा परिणाम म्हणून बऱ्याच जणांना रात्री झोपल्यावर घशाला कोरड पडून जाग येते. यामुळे सलग व शांत झोप मिळत नाही. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामागे काही कारणं असू शकतात.
advertisement
चहा-कॉफी पिण्याची सवय :
भारतात चहा आणि कॉफी प्यायल्याशिवाय बहुतांश जणांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. दिवसातून अनेकदा चहा-कॉफी प्यायली जाते; पण त्यात असलेल्या कॅफिनमुळे शरीरावर गंभीर परिणाम होतात. कॅफिनमुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. कॅफिनमुळे सारखं लघवीला होतं. त्यामुळे शरीरातलं पाणी कमी होतं. अशा वेळी पुरेसं पाणी प्यायलं नाही, तर रात्री तहान लागते.
advertisement
दिवसभर पाणी कमी पिणं :
आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, एका प्रौढ व निरोगी माणसाला दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याची गरज असते. तुम्ही यापेक्षा कमी पाणी पीत असाल, तर रात्रीच्या वेळी तुमचं शरीर तुम्हाला पाणी कमी असल्याचा इशारा देतं. तुम्हाला तहान लागते व झोपेतून जाग येते. म्हणूनच दिवसभर थोड्या थोड्या वेळानं पाणी पीत राहिलं पाहिजे.
advertisement
खारट पदार्थांचं अतिरिक्त सेवन :
शरीरासाठी दररोज फक्त 5 ग्रॅम मिठाची गरज असते. त्यापेक्षा जास्त मीठ खाल्लं तर शरीरावर त्याचा विपरित परिणाम होतो. मिठामध्ये असलेल्या सोडियममुळे शरीरात डिहायड्रेशन होतं. त्यामुळे बरेचदा रात्री तहान लागल्याची भावना बळावते.
म्हणूनच रात्रीची शांत झोप तहान लागल्यामुळे मोडू नये असं वाटत असेल, तर दिवसभर पुरेसं पाणी प्यायलं पाहिजे. चहा-कॉफी पिऊ नये किंवा मर्यादित प्रमाणात प्यावी. सोडा असलेल्या पेयांमध्ये कॅफिन असल्यानं त्यांचं सेवन कमी करावं. जास्त मीठ असणारे पदार्थ कमी खावेत. मसालेदार अन्नपदार्थांमुळेही तहान वाढते. त्यामुळे तेही मर्यादित प्रमाणात खावेत. त्याऐवजी लिंबू सरबत, ताक, फळांचा रस यांचा आहारात समावेश करावा. यामुळे रात्री झोपमोड होऊन तहान लागणार नाही. शांत झोप झाल्यामुळे आरोग्यही उत्तम राहील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2023 6:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
रात्री तहान लागून तुमची झोपमोड होते का? दुर्लक्ष करू नका 'ही' असू शकतात कारणं