whisky: भारतात तयार झाली व्हिस्की; एका बाटलीच्या किंमतीत येईल कार, आता उरले फक्त 2 खंबे!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
सिग्नेचर रिजर्व्ह ब्रँडच्या केवळ 400 बाटल्या तयार करण्यात आल्या होत्या. आणि त्यापैकी आता फक्त दोन बाटल्या हैदराबादमध्ये ड्युटी फ्री शॉपमध्ये उपलब्ध आहेत
ज्यांना मद्य प्रिय आहे, अशा व्यक्तींसाठी त्याच्या किमतीपेक्षा त्याची वैशिष्ट्यं जास्त महत्त्वाची असतात. याच वैशिष्ट्यांमुळे रामपूर सिग्नेचर रिजर्व्ह ही भारतातली सगळ्यात महाग आणि सर्वोत्तम सिंगल माल्ट व्हिस्की म्हणून नावारूपाला आली आहे. याच्या एका बाटलीची किंमत पाच लाख रुपये आहे. रेडिको खेतानच्या रामपूर (उत्तर प्रदेश) फ्रँचायझीद्वारे उच्च पातळीचं प्रावीण्य आणि विशेषतेसह रामपूर सिग्नेचर रिझर्व्ह तयार करण्यात आली आहे. या सिंगल माल्ट व्हिस्कीची लिमिटेड एडिशन (मर्यादित आवृत्ती) सादर करण्यात आली. विक्रीसाठी या व्हिस्कीच्या केवळ 400 बाटल्या तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी केवळ दोन बाटल्या आता शिल्लक आहेत. व्हिस्कीच्या या ब्रँडची असलेली मागणीच या आकड्यांवरून सिद्ध होते.
75 व्या वाढदिवशी सादर केली लिमिटेड एडिशन
द तत्त्व डॉट इन नावाच्या वेबसाइटनुसार, रेडिको खेतान यांनी रामपूर डिस्टिलरीच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आंतरराष्ट्रीय बाजारात रामपूर सिंगल माल्ट व्हिस्कीची सर्वोत्तम आवृत्ती सादर केली. या वैशिष्ट्यपूर्ण व्हिस्कीला भारतातल्या कठीण हवामान परिस्थितीचा सामना करण्यासाठी अमेरिकेच्या प्रमाणित ओक बॅरल्समध्ये ठेवण्यात आलं होते. बारकाईनं आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्हिस्की तयार करण्यात आली आहे. ही भारतात तयार झालेली सगळ्यात जुनी माल्ट व्हिस्की प्रकारातली एक आहे. त्यानंतर चार पिंपं निवडण्यात आली आणि ती पूर्णपणे तयार होण्यासाठी स्पेनच्या जेरेजच्या पीएक्स शेरी बट्समध्ये ठेवण्यात आली. मर्यादित आवृत्ती असलेल्या या बाटल्यांवर रामपूरचे मास्टर मेकर आणि अध्यक्ष डॉ. ललित खेतान यांच्या सह्या आहेत.
advertisement
कमी किमतीत सर्वोत्तम व्हिस्की
रामपूरच्या भारतीय सिंगल माल्ट व्हिस्की कलेक्शनमध्ये मद्यप्रिय लोकांच्या प्रत्येक गटासाठी काही ना काही खास आहे. काही व्हिस्कीच्या किमती कमी आहेत. रामपूर सेलेक्टच्या एका बाटलीची किंमत 14,000 रुपयांपासून सुरू होते. या व्हिस्कीनं सॅन फ्रान्सिस्को वर्ल्ड वाइन अँड स्पिरिट्स अवॉर्ड्समध्ये दोन सुवर्णपदकं जिंकली आहेत. याच्या पीएक्स शेरी एडिशनच्या एका बाटलीची किंमत 1200 रुपये आहे. तर रामपूर डबल कास्कची किंमत सगळ्यात कमी म्हणजे 8500 इतकी आहे. रामपूर असवाला 2023 मध्ये न्यूयॉर्कमध्ये जगातल्या सर्वश्रेष्ठ व्हिस्कीचा डॉन बार्लेकार्न अवॉर्ड मिळाला होता. याच्या एका बाटलीची किंमत 10,000 रुपये इतकी आहे. रामपूर त्रिगुणच्या एका बाटलीची किंमत 17,000 रुपये आणि रामपूर जुगलबंदीच्या एका बाटलीची किंमत 40,000 रुपये इतकी आहे.
advertisement

केवळ दोन बाटल्या शिल्लक
रेडिको खेतानचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक खेतान म्हणाले की, `रामपूर सिग्नेचर रिजर्व्ह ब्रँडच्या केवळ 400 बाटल्या तयार करण्यात आल्या होत्या. आणि त्यापैकी आता फक्त दोन बाटल्या हैदराबादमध्ये ड्युटी फ्री शॉपमध्ये उपलब्ध आहेत, हे सांगताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ही केवळ व्हिस्की नव्हे, तर भारतीय हस्तकौशल्य आणि परंपरेचं हे प्रतिनिधित्व आहे. कौतुकानं भेट म्हणून देण्यासाठी आणि कलेक्शन म्हणून स्वतःजवळ ठेवण्यासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवणाऱ्यांसाठी हे मद्य सर्वोत्तम आहे आणि याचा अनुभव घेण्यासाठी रेडिको खेतान इच्छुकांना/कलेक्शन करणाऱ्यांना निमंत्रित करत आहे.`
advertisement
सिंगल माल्ट व्हिस्की म्हणजे काय?
सिंगल माल्ट व्हिस्की म्हणजे जी एकाच डिस्टिलरीमध्ये फक्त माल्ट केलेल्या बार्लीपासून तयार केली जाते. भिजवलेली बार्ली आधी अंकुरित केली जाते त्यानंतर ती वाळवली जाते आणि नंतर ती बारीक करून शिजवली जाते. या प्रक्रियेमध्ये तयार होणाऱ्या स्टार्चला साखरेत परिवर्तित केलं जातं. कालांतरानं आंबवण्याच्या प्रक्रियेदरम्यान ती अल्कोहोलमध्ये परिवर्तित होते. सिंगल माल्ट व्हिस्कीला सहसा ओक बॅरलमध्ये जतन केलं जातं. जतन करण्याच्या या प्रक्रियेदरम्यान व्हिस्कीमध्ये ओकचे गुण उतरतात. यामुळं व्हिस्कीमध्ये खास फ्लेवर तयार होतात. कमीत कमी तीन वर्षं आणि जास्तीत जास्त कितीही वर्षं ही व्हिस्की जतन केली जाते. जेवढी जास्त जतन केलेली असेल तेवढी तिची किंमत जास्त असते. अलीकडेच मुंबईत ड्यूटी फ्रीमध्ये बोमोर 1965ची एक बाटली 42 लाख रुपये किमतीत विकली गेली होती. रामपूर सिग्नेचर रिजर्व्हने ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे की, सहाजिकच सिंगल माल्टची मागणी करणारे ग्राहकही कमी नाहीत.
advertisement
102 पेक्षा जास्त देशात विकला जातो हा ब्रँड
रेडिको खेतान लिमिटेड भारतात आयएमएफएलचा सगळ्यात जुना आणि मोठ्या निर्मात्यांपैकी एक आहे. सुरुवातीला रामपूर डिस्टिलरीच्या रूपात ओळखल्या जाणाऱ्या रेडिको खेतान कंपनीनं 1943मध्ये कामाला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत ही कंपनी अन्य स्पिरिट निर्मात्यांसाठी प्रमुख घाऊक स्पिरिट सप्लायर आणि बॉटलरच्या रूपात उदयास आली आहे. कंपनीने 1998मध्ये 8 पीएम व्हिस्कीची सुरुवात केली आणि नंतर स्वतःच्या ब्रँडची निर्मिती केली. रेडिको खेतान ही भारतातल्या अशा काही कंपन्यांमधली एक आहे, ज्यांनी आपला संपूर्ण ब्रँड पोर्टफोलियो विकसित केला आहे. ही कंपनी भारतातल्या अल्कोहोलिक पेय पदार्थांमध्ये सगळ्यात मोठ्या एक्स्पोर्टर्सपैकी एक आहे. याचे ब्रँड जगभरातल्या 102 देशांपेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 07, 2024 9:43 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
whisky: भारतात तयार झाली व्हिस्की; एका बाटलीच्या किंमतीत येईल कार, आता उरले फक्त 2 खंबे!