Mumbai Local: सीवूड्स-बेलापूर-उरण लोकलमध्ये मोठा बदल, नवीन वेळापत्रक कधीपासून लागू?
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Mumbai Local: नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांच्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी मुंबई: नवी मुंबईतील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सीवूड्स दारवे-बेलापूर-उरण रेल्वेमार्गावर लवकरच लोकलच्या 20 नवीन फेऱ्या सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ आणि कमी वेळेत होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून हे नवीन वेळापत्रक लागू होणार आहे, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
सध्या या मार्गावर लोकल गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने प्रवाशांना गाडीसाठी बराच वेळ थांबावे लागते. गर्दीच्या वेळी लोकल एका तासाच्या अंतराने आणि इतर वेळी दीड तासांच्या अंतराने धावत असल्याने अनेकदा प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते. आता नव्या 20 लोकल फेऱ्यांमुळे प्रवाशांना गाडीची वाट बघत बसावं लागणार नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
रेल्वे प्रशासनाने 10 अप आणि 10 डाउन अशा 20 लोकल गाड्या या मार्गावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या 40 वरून 60 वर जाणार आहे. ही सुविधा नवी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येचा आणि प्रवाशांच्या मागणीचा विचार करून देण्यात आली आहे.
advertisement
याशिवाय, उरण मार्गावर भविष्यातील प्रवासी संख्या लक्षणीयरीत्या वाढण्याचा अंदाजही रेल्वेने व्यक्त केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात असून, यामुळे विमानतळालगत असलेल्या तारघर स्टेशनचा या मार्गाला थेट फायदा होणार आहे. हे स्टेशन सुरू झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे.
प्रवाशांच्या गरजेनुसार, रेल्वे प्रशासनाने टप्प्याटप्प्याने आणखी फेऱ्या वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. या निर्णयामुळे सीवूड्स-बेलापूर-उरणमार्गावरील प्रवास अधिक वेगवान, वेळेवर आणि सुकर होणार आहे, अशी अपेक्षा आहे.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
September 23, 2025 4:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Local: सीवूड्स-बेलापूर-उरण लोकलमध्ये मोठा बदल, नवीन वेळापत्रक कधीपासून लागू?