Shivaji University: कोल्हापुरातील संशोधकांचा जगात डंका! 20 जणांची थेट स्टॅनफोर्डने घेतली दखल
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Shivaji University: जागतिक संशोधन क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ चर्चेत आलं आहे.
कोल्हापूर: अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीच एक संशोधकांची यादी प्रसिद्ध केली आहे. 2025 या वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या या यादीत जगातील आघाडीच्या 2 टक्के संशोधकांचा समावेश आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील 20 संशोधकांना या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळालं आहे. त्यामुळे विद्यापिठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, संशोधनाची गुणवत्ता निर्धारित करण्यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठाने शोधनिबंधाला मिळणारी सायटेशन्स, एच निर्देशांक, सहलेखकत्व (को-ऑथरशीप), संशोधन लेखकाची नेमकी भूमिका या घटकांचा सारासार विचार करून यादी तयार केली आहे. जगभरातील आघाडीच्या संशोधकांची यादी तयार करताना, सर्वसमावेशक आणि सर्वमान्य अशी संयुक्त सूचक (सी स्कोर) निर्देशांक काढण्यात आला आहे.
advertisement
स्टॅनफोर्डच्या यादीत स्थान मिळालेले संशोधक
शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आणि ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रमोद पाटील (पदार्थ विज्ञान), निवृत्त प्राध्यापक ए. व्ही. राव (पदार्थ विज्ञान), निवृत्त प्राध्यापक सी. एच. भोसले (पदार्थ विज्ञान), डॉ. केशव राजपुरे (पदार्थविज्ञान), डॉ. विठोबा पाटील (पदार्थ विज्ञान), निवृत्त प्राध्यापक डॉ. संजय गोविंदवार (जैवरसायनशास्त्र), डॉ. ज्योती जाधव (जैवरसायनशास्त्र), डॉ. अण्णासाहेब मोहोळकर (पदार्थविज्ञान), डॉ. सागर डेळेकर (रसायनशास्त्र), डॉ. कल्याणराव गरडकर (रसायनशास्त्र), डॉ. तुकाराम डोंगळे (नॅनोसायन्स), डॉ. सुशीलकुमार जाधव (नॅनोसायन्स), डॉ. हेमराज यादव (रसायनशास्त्र), डॉ. संजय लठ्ठे (पदार्थविज्ञान), डॉ. के. के. पवार (जैवतंत्रज्ञान), सचिन ओतारी (जैवतंत्रज्ञान), डॉ. अनिल घुले (रसायनशास्त्र), डॉ. शरदराव व्हनाळकर (पदार्थविज्ञान), डॉ. तेजस्विनी भट (पदार्थविज्ञान) आणि डॉ. मानसिंग टाकळे (पदार्थविज्ञान) यांना स्टॅनफोर्डच्या यादीत स्थान मिळालं आहे.
advertisement
फॅब फाईव्ह
स्टॅनफोर्ड विद्यापिठाने संशोधन क्षेत्रातील सर्वकालिक कामगिरीच्या आधारे देखील जागतिक संशोधकांची एक यादी तयार केली आहे. या यादीमध्ये देखील शिवाजी विद्यापिठाचं अस्तित्व ठळकपणे दिसत आहे. या यादीत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह डॉ. ए. व्ही. राव, डॉ. केशव राजपुरे, डॉ. ज्योती जाधव आणि डॉ. सी. एच. भोसले या पाच संशोधकांचा समावेश आहे.
advertisement
शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, "या संशोधकांना जागतिक यादीमध्ये स्थान मिळवलं ही कौतुकास्पद बाब आहे. त्यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ अव्याहतपणे केलेलं संशोधन आणि कष्टाचं हे फळ आहे. या सर्वांनी विद्यापीठात एक संशोधनाबाबत एक शिस्त निर्माण केली आहे. त्यामुळे विद्यापीठात उत्तम संशोधन परंपरा निर्माण झाली आहे."
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 26, 2025 12:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shivaji University: कोल्हापुरातील संशोधकांचा जगात डंका! 20 जणांची थेट स्टॅनफोर्डने घेतली दखल