Ration Card: रेशन कार्डसंदर्भात सरकार अॅक्शन मोडवर! राज्यातील या लोकांचा लाभ होणार बंद
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Ration Card News : राज्यभरात अपात्र रेशन कार्डधारक शोधण्याची मोहीम 1 एप्रिलपासून सुरू करण्यात आली असून, ती पुढील एक महिना राबविली जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासाठी अधिकृत आदेश जारी केला आहे.
मुंबई : राज्यभरात अपात्र रेशन कार्डधारक शोधण्याची मोहीम 1 एप्रिलपासून सुरू करण्यात आली असून, ती पुढील एक महिना राबविली जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासाठी अधिकृत आदेश जारी केला आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील अंत्योदय, केशरी व शुभ्र अशा सर्व प्रकारच्या रेशन कार्डांची तपासणी केली जाणार आहे.
या तपासणी मोहिमेचा मुख्य उद्देश अपात्र आणि बनावट कार्डधारकांना ओळखणे आणि त्यांच्या रेशन कार्डांना तत्काळ रद्द करणे हा आहे. विशेषतः, बांगलादेशी घुसखोर किंवा कोणताही विदेशी नागरिक जर रेशन कार्डधारक असल्याचे आढळले, तर अशा कार्डांना तात्काळ रद्द करण्यात येईल.
तपासणी प्रक्रियेसाठी प्रत्येक रेशन दुकानदाराला त्यांच्या दुकानातील कार्डांची माहिती तपासण्यासाठी फॉर्म दिले जातील. कार्डधारकांकडून वास्तव्याचा पुरावा मागवण्यात येणार आहे. ज्यांनी पूर्वी पुरावा सादर केलेला नसेल, त्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात येईल. या कालावधीत पुरावा न सादर केल्यास संबंधितांचे रेशन कार्ड रद्द केले जाईल.
advertisement
अशा तपासणीत एका पत्त्यावर दोन रेशन कार्ड असल्याचे, किंवा एका कुटुंबात दोन वेगवेगळी कार्डे जारी झाल्याचे आढळल्यास, त्यापैकी एक कार्ड रद्द केले जाणार आहे. ही मोहीम दरवर्षी नियमितपणे राबवली जाणार असून, यामुळे योग्य लाभार्थ्यांपर्यंतच सवलती पोहोचवणे शक्य होणार आहे.
राज्य सरकारने या मोहिमेसाठी सर्व संबंधित यंत्रणांना दिशा-निर्देश देत कार्यवाही सुरू केली आहे. नागरिकांनी सहकार्य करून आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे. योग्य पात्रतेच्या आधारावरच रेशन सुविधा मिळावी, हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 06, 2025 2:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ration Card: रेशन कार्डसंदर्भात सरकार अॅक्शन मोडवर! राज्यातील या लोकांचा लाभ होणार बंद