शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण, ‘झिरो बजेट’ नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोग; 'ही' शेती कशी केली जाते?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेती करण्यासाठी झिरो बजेट नैसर्गिक शेती हा आजच्या काळातील अत्यंत महत्वाचा पर्याय ठरत आहे. रासायनिक खते, कीटकनाशके आणि बाजारातील खर्चिक साधनांशिवाय शेती करण्याची ही पद्धत ‘झिरो बजेट’ म्हणून ओळखली जाते.
शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेती करण्यासाठी झिरो बजेट नैसर्गिक शेती हा आजच्या काळातील अत्यंत महत्वाचा पर्याय ठरत आहे. रासायनिक खते, कीटकनाशके आणि बाजारातील खर्चिक साधनांशिवाय शेती करण्याची ही पद्धत ‘झिरो बजेट’ म्हणून ओळखली जाते. प्रसिद्ध कृषी तज्ञ सुभाष पालेकर यांनी या संकल्पनेचा प्रसार केला आहे. या पद्धतीचा उद्देश एकच, शेतकरी कर्जमुक्त होऊन स्वतःच्या नैसर्गिक संसाधनांमधूनच शेती करावी आणि आत्मनिर्भर व्हावा. मातीची सुपीकता राखत नैसर्गिक परिसंस्था टिकवून ठेवण्याचा हा प्रयत्न अनेक राज्यांमध्ये यशस्वी होताना दिसत असल्याची माहिती बीड जिल्ह्यातील कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी दिली.
‘झिरो बजेट’ नैसर्गिक शेतीत मातीचे आरोग्य जपण्यासाठी रासायनिक खतांऐवजी गायीचे शेण, मूत्र, सेंद्रिय पदार्थ आणि सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. बाजारातील कीटकनाशकांवर अवलंबून राहण्याऐवजी घरगुती नैसर्गिक द्रव्यांचा वापर केला जातो. परिणामी पिकांवर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि नफ्यात वाढ होताना दिसते. अनेक शेतकरी सांगतात की, पारंपरिक पद्धतीपेक्षा नैसर्गिक शेतीत जमीन जास्त काळ सुपीक राहते आणि पिकांची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. तज्ञांच्या मते या पद्धतीमुळे कर्जमुक्त शेतीची संकल्पना प्रत्यक्षात येणे शक्य होत आहे.
advertisement
या पद्धतीचे चार महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत, जिवामृत, घनजिवामृत, आच्छादन (Mulching) आणि वाफसा. जिवामृत हे द्रवरूप सेंद्रिय खत असून गायीचे शेण, मूत्र, गूळ आणि बेसन यांच्या मिश्रणातून तयार केले जाते. ते पिकांच्या वाढीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. घनजिवामृत हे याच घटकांचे घन स्वरूप असून मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते. आच्छादन तंत्राने मातीवर पाने, कचरा किंवा तणांचा थर टाकला जातो, ज्यामुळे ओलावा टिकतो आणि तण नियंत्रण करणे सोपे जाते. वाफसा म्हणजे भुसभुशीत माती तयार करून हवेमधील आर्द्रता मातीमध्ये टिकवून ठेवणे. या सर्व तंत्रांच्या संगमाने पिकांची वाढ नैसर्गिकरीत्या होते.
advertisement
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी गुंतवणुकीत उत्पादन घेण्याची क्षमता. पारंपरिक शेतीत खत, औषधे आणि मजुरीचा खर्च वाढत असताना नैसर्गिक शेतीत तो 50 ते 70 टक्क्यांनी कमी होतो. बाजारपेठेत नैसर्गिक उत्पादनांना जास्त मागणी असल्याने त्यांना चांगला भावही मिळतो. विविध जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकरी या शेतीकडे वळत आहेत आणि त्यातून आर्थिक स्थैर्य मिळवू लागले आहेत. योग्य प्रशिक्षण आणि सरकारी पाठबळ मिळाल्यास या पद्धतीला भविष्यात मोठे स्थान मिळू शकते, असा तज्ञांचा विश्वास आहे.
advertisement
कृषी क्षेत्रातील वाढत्या आव्हानांमुळे आज शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती ही काळाची गरज बनली आहे. रासायनिक शेतीच्या मर्यादा लक्षात घेता झिरो बजेट नैसर्गिक शेती ही फक्त पर्याय नसून नवी कृषी क्रांती ठरू शकते. सामान्य शेतकरी साध्या पद्धतीने ही शेती सुरू करू शकतो आणि स्वतःची नैसर्गिक शेती परिसंस्था तयार करू शकतो. शेतीत कमी खर्च, अधिक नफा आणि पर्यावरणाचे संरक्षण – या तीन गोष्टी साध्य करायच्या असतील तर ही पद्धत भविष्यातील कृषी परिवर्तनाची दिशा ठरू शकते.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 24, 2025 9:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण, ‘झिरो बजेट’ नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोग; 'ही' शेती कशी केली जाते?

