Ahilyanagar-Beed Railway: रेल्वेच्या कासवगतीने प्रवासी त्रस्त, अडीच तासांचा प्रवास होतो 5 तासात!
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Ahilyanagar-Beed Railway: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अहिल्यानगर ते बीड रेल्वेला 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी' हिरवा झेंडा मिळाला.
बीड: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अहिल्यानगर ते बीड रेल्वेला 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी' हिरवा झेंडा मिळाला. ही रेल्वे सुरू झाल्यामुळे तब्बल 40 वर्षांपासून बीडकरांनी पाहिलेलं स्वप्न साकार झालं आहे. बीड जिल्ह्यातील लोकांच्या दृष्टीने हा कौतुकाचा विषय आहे. मात्र, प्रवाशांच्या वाट्याला निराशाला आली आहे. रेल्वेच्या वेगाबाबत अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर ते बीड मार्गावर 17 सप्टेंबरपासून 'डेमू' म्हणजेच डिझेल इंजिनवर चालणारी रेल्वेगाडी चालवली जात आहे. 167 किलोमीटर अंतर कापण्यासाठी ही रेल्वे तब्बल साडेपाच तास घेत असल्याचं समोर आलं आहे. रस्तेमार्गे हाच प्रवास अडीच ते तीन तासांत होतो. ताशी 30 किलोमीटर वेगाने धावणारी ही गाडी लहान मुलांच्या खेळण्यातील 'आगीनगाडी' ठरत आहे.
advertisement
डेमू गाडीचा वेग कमी असल्याने प्रवासाला जास्त वेळ लागत आहे. नगर ते बीड अंतर रस्तेमार्गे अडीच ते तीन तासात कापता येते. रेल्वेला मात्र, साडेपाच तास लागत आहेत. शिवाय, बीडमधील रेल्वे स्टेशन शहरापासून 6 किलोमीटर दूर असल्याने स्टेशनवर उतरून शहरात जाण्यासाठी प्रवाशांना आणखी जास्त वेळ लागत आहे.
advertisement
अहिल्यानगर-बीड रेल्वे अहिल्यानगरहून सकाळी 6.55 वाजता सुटते आणि दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी बीडला पोहोचते. परतीच्या प्रवासात ही गाडी बीडहून दुपारी 1 वाजता निघते आणि संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी अहिल्यानगरला पोहोचते. आठवड्यात सहा दिवस ही गाडी धावणार असून रविवारी विश्रांती असणार आहे. या गाडीचं प्रवासभाडं पहिल्या टप्प्यासाठी 10 रुपये. त्यापुढे 15, 20, 25, 30, 25 आणि 40 रुपये असे टप्पे आहेत. नगर ते बीड हा प्रवास फक्त 40 रुपयांत करता येतो.
advertisement
अहिल्यानगरहून सकाळीच बीडला जाणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सकाळी जाताना या गाडीला प्रतिसाद कमीच असतो. बीडहून दुपारी नगरला येऊन काय करणार, असा प्रश्न बीडकरांना पडला आहे. त्यामुळे या गाडीला कायमस्वरूपी कसा प्रतिसाद मिळेल, याबाबत शंका निर्माण झाली आहे.
माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार, या रेल्वेसाठी महापारेषणकडून वीज घेतली जाणार आहे. त्यासाठी 232 केव्हीए क्षमतेच्या दोन उपकेंद्रांची उभारणी केली जात आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे डिझेलवर धावेल. विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास सुसाट होण्याची शक्यता आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
September 21, 2025 2:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ahilyanagar-Beed Railway: रेल्वेच्या कासवगतीने प्रवासी त्रस्त, अडीच तासांचा प्रवास होतो 5 तासात!