OBC Melava : '27 जानेवारीला गुलाल उधळला, मग पुन्हा उपोषण का?' भुजबळांचा जरांगेंना खोचक टोला
- Published by:Rahul Punde
Last Updated:
OBC Melava : अहमनगर शहरात झालेल्या ओबीसींच्या मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केलं आहे.
अहमदनगर, (हरिष दिमोटे, प्रतिनिधी) : राज्यात आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यानंतर आता ओबीसी समाजातील नेत्यांनीही सभा घ्यायला सुरुवात केली आहे. आज (शनिवार) शहरात ओबीसींचा (OBC) महाएल्गार मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन थेट सरकारला घेरलं आहे. या कार्यक्रमाला भाजप आमदार गोपिचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह अनेक ओसीबी नेते उपस्थित होते.
छगन भुजबळांचा सरकारला प्रश्न
मनोज जरांगे पाटील यांनी 27 जानेवारीला गुलाल उधळला. मग पुन्हा उपोषणाला का बसणार आहेत? ज्याला अध्यादेश आणि मसुद्यातील फरक कळत नाही. चार दिवसांपासून उन्माद सुरू आहे. ओबीसींच्या घरासमोर शिवीगाळ केली जाते. आम्ही जिंकलो म्हणून जल्लोष करताय. मग उपोषण कशासाठी? असा प्रश्न भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना केला आहे. एक एक गोष्ट मागण्यासाठी राज्यातील लोक भांडत असतात त्यांना काही मिळत नाही. मात्र, यांनी उपोषण करणार म्हटलं की लगेच सरकारची धावाधाव होते. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. वेगळं आरक्षण द्या हरकत नाही. मला मुख्यमंत्र्याचा अवमान करायचा नाही. मात्र, तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेलात आणि जाहीर केलं की मी घेतलेली शपथ पूर्ण केली. मग शपथ पूर्ण झाली आहे. तर हे सर्वेक्षण कशासाठी? आयोगाचं खोटं सर्वेक्षण सुरू आहे. 180 प्रश्न आहे, एका घराला दीड तास लागतो. मग एव्हढ्या कमी वेळेत कसं सर्व्हेक्षण झालं? फक्त जात विचारली जाते आणि बाकी ऑफीसमध्ये भरलं जातंय, असा गंभीर आरोप भुजबळ यांनी सर्वेक्षणावर केला आहे.
advertisement
मराठा कुणबी हाताने लिहलं जातंय. मराठा की मराठी लिहायचं हे ही कळत नाही. खोटं रेकॉर्ड तयार करण्यासाठी 360 कोटी दिले का? असा सवाल भुजबळांनी सरकारला विचारला आहे. सगेसोयरे म्हणजे यांना खोटं प्रमाणपत्र द्या आणि सगळ्यांनाही द्या. अशा रितीने दाखले दिले गेले तर महाराष्ट्रातील सगळा मराठा समाज कुणबी होईल, हे कोर्टाचे निरीक्षण आहे. खोटी वंशावळ जोडण्याचं काम केलं जातं असल्याचा एका पुरावाही भुजबळ यांनी दिला आहे.
advertisement
झुंडशाहीने कुणी आरक्षण घेतलं तर कोर्टात आव्हान देता येईल. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तरी ओबीसींच्या सर्व सवलती मराठा समाजाला देणार, असं सरकारने जाहीर केलं आहे. मग ब्राह्मण आणि जैनांनाही द्या. फक्त मराठ्यांनाच का? मराठा समाजासाठी मंत्र्यांची कमेटी धडाधड निर्णय घेते. आम्हाला मात्र कॅबिनेट पुढे जावं लागतं, असं म्हणत भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिला.
advertisement
गावागावात दहशत निर्माण केली जात आहे. दोनतीन घरं असलेलं ओबीसी गाव सोडत आहेत. जर मराठे बहिष्कार टाकणार असतील. तर न्हाव्यांनी मराठ्यांची दाढी कटींग करू नका. मग भादरा तुम्हीच एकमेकांची. तुमच्या काळात असा भेदभाव होणं योग्य नाही. फडणवीस यांना भुजबळांचे आवाहन. रात्री दोन दोन वाजता सभा घेतल्या जातात. काय कारवाई झाली? असंही भुजबळ म्हणाले.
Location :
Ahmadnagar Cantonment,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Feb 03, 2024 7:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
OBC Melava : '27 जानेवारीला गुलाल उधळला, मग पुन्हा उपोषण का?' भुजबळांचा जरांगेंना खोचक टोला







