Sanjay Raut : प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Sanjay Raut : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? यावर शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अहमदनगर, (साहेबराव कोकणे, प्रतिनिधी) : 2024 च्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या राजकारणासाठी प्रादेशिक पक्षांना काँग्रेससोबत तर काही प्रकरणात काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल, असं वक्तव्य शरद पवारांनी एका खाजगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे महाविकास आघाडीची सभा घेण्यात आली. या सभेला शरद पवार, संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले संजय राऊत?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका खाजगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य केलं होतं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. महाराष्ट्राबाहेर त्यांच्या पक्षाचे आमदार आणि खासदार आहेत. ते नेमके कोणत्या प्रादेशिक पक्षाविषयी बोलले हे मला माहीत नाही. मात्र, प्रादेशिक पक्ष हे स्थानिक मुद्द्यांवर त्यांची अस्मिता म्हणून बनलेले असतात. ज्या-ज्या प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय स्तरावर जाण्याचा प्रयत्न केला ते पक्ष संपलेले आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
advertisement
यावेळी संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे, देशातील आणि राज्यातील परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात भारतात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षात दिसतील. पंतप्रधान हे प्रधानमंत्री राहिले नसून ते आता प्रचार मंत्री झाले आहेत, असेही राऊत म्हणाले.
पवार काय म्हणाले होते?
शरद पवार पुढे म्हणाले, येत्या काही वर्षात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक संलग्नपणे काम करतील. त्याशिवाय पक्षाच्या भवितव्याचा विचार करून काही वेळा काँग्रेससोबत विलीन होण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल. समविचारी लोकांसोबत काम करण्यासाठी उद्धव ठाकरेही सकारात्मक असल्याचे पवार म्हणाले.
advertisement
भविष्यात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांमध्ये कोणताही फरक असल्याचं मला वाटत नाही. आम्ही गांधी, नेहरू या विचारसरणीचे आहोत. याला जोडूनच ते म्हणाले, मी आता काहीच सांगत नाहीये. माझ्या सहयोगींशी सल्लामसलत केल्याशिवाय मी काहीच सांगू शकत नाही. आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीच्या जवळ आहोत. त्यामुळे भविष्याचा विचार एकत्र येऊन केला जाईल. मात्र मोदींसोबत जुळवून घेणं कठीण आहे.
view commentsLocation :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
May 08, 2024 7:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Sanjay Raut : प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया


