राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले 'संघटन महासचिव', अजित पवारांकडून खास माणसाला मोठी जबाबदारी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
संघटनात्मक अडथळे दूर करून संघटन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने नव्या पदाची निर्मिती करण्याचा मनोदय अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी बोलून दाखवला.
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटन बांधणी सुरू आहे. दस्तुरखुद्द अजित पवार देखील 'राष्ट्रवादी परिवार मिलन' कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध लोकांना भेटून त्यांना पक्षाची ध्येयधोरणे समजावून सांगत आहेत. अशातच संघटनेसाठी महत्त्वाचे असणारे संघटन महासचिव पदाची निर्मिती करून त्या पदावर संजय खोडके यांना नियुक्त करण्यात आले आहे. अजितदादांकडून संजय खोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले 'संघटन महासचिव' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संघटन महासचिव पदामुळे कार्यकर्त्यांना संघटनेसंबंधी मुद्दे थेट मांडता येणार आहेत.
संघटनात्मक अडथळे दूर करून संघटन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने नव्या पदाची निर्मिती करण्याचा मनोदय अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी बोलून दाखवला. त्यानुसार पक्षाच्या नियमित मंगळवारच्या बैठकीत नव्या पदाची निर्मिती करण्यात आली. मुंबईतील एनएससीआय, वरळी येथे आमदार आणि जिल्हाध्यक्षांच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णयाची घोषणा करण्यात आली.
नव्या पदांमुळे राज्य नेतृत्व आणि जिल्हा पातळीवरील संघटनांमध्ये समन्वय अधिक बळकट होणार आहे. तळागाळातील संघटन मजबूत करण्यावर आणि पक्षातील शिस्त वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.
advertisement
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सर्वंकष आराखड्याची आखणी सुरू आहे. निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी पक्षात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पक्षाचे ‘राष्ट्रवादी कनेक्ट’ अॅप लाँच करण्यात आले असून कार्यकर्त्यांशी संवाद आणि समन्वय सुलभ होणार आहे, जिल्हानिहाय ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रम नियमितरित्या आयोजित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आमदार, जिल्हाध्यक्ष आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये एकसंध समन्वय राखण्यावर भर देण्यात येणार आहे.
advertisement
शिस्त, संघभावना आणि जबाबदारी यांना प्राधान्य द्या असा संदेश पक्ष नेतृत्वाने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिला आहे. आगामी निवडणुकांसाठी बूथ पातळीवरची संघटना मजबूत करण्याला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असून त्यादृष्टीने जोरदार तयारी करा, अशा सूचना तटकरे यांनी दिल्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 8:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले 'संघटन महासचिव', अजित पवारांकडून खास माणसाला मोठी जबाबदारी