तुम्ही सोबत या-आपण लढू, भाजपने दणका दिल्यानंतर अजितदादांचा सतेज पाटलांना फोन
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pune Mahapalika Election: अजित पवार जरी सत्तेत सहभागी असले तरी 'शतप्रतिशत भाजप' हा संकल्प मनात ठेवून भाजप अजित पवारांना कमजोर करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
पुणे : पुणे शहर आणि जिल्हा हा खरे तर पवारांचा बालेकिल्ला. गेल्या अनेक दशकांपासून पुणेकरांनी पवार कुटुंबाला साथ दिली. परंतु २०१४ नंतर राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पुण्याच्या शहरी आणि ग्रामीण भागांत शिरकाव केल्यानंतर राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का बसला. गेल्या १० वर्षात अजित पवार यांचे अनेक विश्वासू साथीदारही भाजपने गळाला लावले. आताही महापालिका निवडणूक तोंडावर असताना अजित पवार यांचे जवळपास डझनभर मोहरे भाजपने आपल्याकडे खेचले. भारतीय जनता पक्षाच्या फोडाफोडीच्या कृत्यावर अजित पवार यांनी संताप व्यक्त करीत इतर पक्षांना सोबत घेऊन भाजपविरोधात मोट बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी काँग्रेस सोबत येते का? याची चाचपणी करायला अजित पवार यांनी सुरुवात केली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर अजित पवार यांचे निर्विवाद वर्चस्व होते. एकसंध राष्ट्रवादी असताना शरद पवार यांनी पुण्याच्या राजकारणाचा सारा कारभार अजित पवार यांच्याकडे सोपवला होता. अजित पवार यांनीही तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन पुण्याच्या राजकारणावर हळूहळू पकड मिळवली. गेल्या २० वर्षांत अनेक सहकाऱ्यांना अजित पवार यांनी संधी दिली. पुण्याचे नागरीकरण वाढत असताना, पुणेकरांच्या प्रश्नांचा प्राधान्यक्रम बदलत असताना लोकमताची नाडी ओळखणारे सहकारी अजित पवार यांनी हेरले. यातूनच त्यांनी अनेक राजकारणी घडवले. परंतु मोदी-फडणवीस यांच्या उदयानंतर पुण्याचे राजकारणही तितक्याच वेगाने बदलले. २०१७ साली झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचा धुव्वा उडवून प्रथमच महापालिका ताब्यात घेतली. अजित पवार यांच्या वर्चस्वाला बालेकिल्ल्यात हादरे देण्याची ही सुरुवात होती. आता अजित पवार जरी सत्तेत सहभागी असले तरी 'शतप्रतिशत भाजप' हा संकल्प मनात ठेवून भाजप अजित पवारांना कमजोर करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
advertisement
भाजपने दणका दिल्यानंतर अजितदादांचा सतेज पाटलांना फोन
त्यामुळे २०२६ च्या महापालिका निवडणुकीत अजित पवारांनी महाविकास आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसला सोबत घेण्यासाठी अजित पवार यांनी काँग्रेसचे नेते बंटी उर्फ सतेज पाटील यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. सोबत आलात तर एकत्र लढू, भाजपचा विजयी वारू रोखण्यासाठी एकत्र आले पाहिजे, अशी गळ अजित पवार यांनी बंटी पाटलांना घातल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
advertisement
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींसह महाविकास आघाडीची सोबत मोट बांधण्याचे अजित पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आली तर भाजपला चांगली टक्कर देऊन पुणे महापालिकेचा गड पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न अजित पवार यांचा असेल.
भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर अजित पवार संतापले
महायुतीत फोडाफोडी नको, एकमकेांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना प्रवेश देऊन महायुतीत वाद नको, असे वरिष्ठ स्तरावर ठरलेले असतानाही भाजपने पुण्यात अजित पवार यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने केलेल्या फोडाफोडीवर अजित पवार संतापले. महायुतीच्या एकत्रित बैठकीत या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 11:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुम्ही सोबत या-आपण लढू, भाजपने दणका दिल्यानंतर अजितदादांचा सतेज पाटलांना फोन








