तुझ्या काकाचा पक्ष झालाय का? राष्ट्रवादी सोडून गेलेल्या योगेश क्षीरसागरांवर अजितदादांचा प्रहार
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
बीड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रचार सभा घेतली. अपेक्षेप्रमाणे त्यांनी खास त्यांच्या शैलीत भाजपवासी झालेल्या योगेश क्षीरसागर यांच्यावर तोफ डागली.
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : बीड शहर जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथे एका घराण्याची मक्तेदारी होती. त्याच घरातील नगराध्यक्ष व्हायचा किंवा ते सांगतील तोच नगराध्यक्ष व्हायचा. पण विकास काडीचा झाला नाही. नगरपालिकेला ५३ लोक द्यायचे आहेत, माझ्याकडे एबी फॉर्म पाठवा, असा मला फोन केला. मी म्हटलं तुझ्या काकाचा पक्ष झालाय काय? अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षात गेलेल्या योगेश क्षीरसागर यांच्यावर प्रहार केले.
बीड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रचार सभा घेतली. राष्ट्रवादीच्या पॅनेलला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. योगेश क्षीरसागर यांच्या भाजपप्रवेशानंतर अजित पवार काय बोलणार, याकडे बीडच्या मतदारांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी खास त्यांच्या शैलीत क्षीरसागर यांच्यावर तोफ डागली.
योगेश क्षीरसागरांवर अजितदादांचा प्रहार
कुणाचीही दहशत खपवून घेऊ नका. तुम्हाला उमेदवार दिलेल्या निवृत्त नायब तहसीलदार आहेत. त्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत. त्यांना बहुमताने निवडून द्या, अशी विनंती त्यांनी मतदारांनी केली. त्याचवेळी नुकतेच भाजपवासी झालेल्या योगेश क्षीरसागर यांच्यावरअजित पवार यांनी बोचरी टीका केली. बारामतीत माझ्याच मनावर नगराध्यक्ष होतो. पण का? कारण मी विकास केला. तिथे जाऊन विचारा कुणाची दहशत खपून घेतली जाते का? विकास केला का? पाणी दिलं का? या सगळ्या गोष्टी बारामतीत केल्या आहेत आणि बीडलाही करेन, हे सांगण्यासाठीच आजची सभा घेतली आहे, असे अजित पवार म्हणाले.
advertisement
निवडून द्या, प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेईन, चुकत असेल तर त्याला जाब विचारेन
इथे सगळं भ्रष्टाचाराने पोखरलंय. जाऊ तिथे खाऊ असा इथला धंदा आहे. मागील २५-३० वर्षात झालेले वाटोळे मी बघितलेय. मी हे सगळे बदलेन. असल्या लोकांच्या हातात सत्ता कशी काय देता? ज्यांचे शहराकडे लक्ष नाही. त्यासाठी मी उच्चशिक्षित उमेदवार दिले आहेत. तुम्हाला नगराध्यक्षा म्हणून दिलेल्या उमेदवार निवृत्त नायब तहसीलदार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या लोकांची काम करताहेत. मी प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेईन. कोणी चुकत असेल तर त्याला जाब विचारेल, असे अजित पवार म्हणाले.
advertisement
तुझ्या काकाचा पक्ष झालाय का?
काहीजण म्हणतात आम्हीच कामं मंजूर केली. अरे तुझ्या हातात काय होतं. मी पालकमंत्री आहे, अशा शब्दात त्यांनी योगेश क्षीरसागरांना खडसावले. तसेच निवडणुकीआधीचा प्रसंगही सांगितला. मला फोन करून ५३ एबी फॉर्म मागितले. तुझ्या काकाचा पक्ष झालाय काय? असे मी त्याला म्हणालो, असे अजित पवार यांनी भर सभेत सांगितले.
view commentsLocation :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
November 24, 2025 10:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुझ्या काकाचा पक्ष झालाय का? राष्ट्रवादी सोडून गेलेल्या योगेश क्षीरसागरांवर अजितदादांचा प्रहार


