Amravati Mayor Election: महापौर पदाच्या पाठिंब्यावरून भाजपमध्येच दोन गट, वरिष्ठांची डोकेदुखी वाढली, अमरावतीत नवा ट्वि्स्ट
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Amravati Mayor Election BJP: अमरावती महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यापूर्वीच भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. रवी राणांच्या समर्थनावरून पक्षात वाद सुरू असून, संजय खोडकेंच्या इशाऱ्याने पेच अधिकच वाढला आहे.
अमरावती: अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक अवघ्या पाच दिवसांवर आली असताना, सत्तेच्या गणितापेक्षा भाजपमधील अंतर्गत गटबाजीने राजकारण तापले आहे. २५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपमध्ये आता महापौर पदासाठी आणि सत्ता स्थापन करण्यासाठी कोणाचा पाठिंबा घ्यायचा, यावरून दोन गट पडले आहेत. एका बाजूला सत्तेची समीकरणे जुळवताना राजकीय पक्षांच्या नेत्यांना ताण येतो. मात्र, अमरावतीत भाजपबाबत उलट स्थिती असल्याचे दिसून येत आहे.
अमरावती महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतापासून दूर आहे. त्यामुळेच भाजपला इतर पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. अमरावतीमध्ये रवी राणा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय खोडके यांनी पाठिंब्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यावरून आता भाजपात दोन गट पडले आहेत.
भाजपमध्येच 'राणा समर्थक' विरुद्ध 'राणा विरोधक' असे दोन स्पष्ट गट पडले असून, अमरावतीचा महापौर कोण होणार? यापेक्षा भाजप कोणाला सोबत घेणार? यावर पेच निर्माण झाला आहे.
advertisement
'राणा' वरुन भाजपमध्ये दोन गट
महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला २० अतिरिक्त मतांची गरज आहे. यासाठी आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष (१५ जागा) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (११ जागा) हे दोन पर्याय समोर आहेत. मात्र, यावरून भाजपमध्ये यादवी सुरू झाली आहे:
राणा समर्थक गटाचे म्हणणे आहे की, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि जुन्या मैत्रीखातर रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी.
advertisement
तर, दुसरीकडे राणा विरोधक गटाकडून, राणांना वगळून राष्ट्रवादी आणि इतर अपक्षांच्या जोरावर सत्ता स्थापन करण्याचा आग्रह धरला जात आहे. राणांना सोबत घेतल्यास स्थानिक राजकारणात भाजपचे नुकसान होईल, अशी भीती या गटाला वाटत आहे.
बावनकुळेंचे 'गूढ' विधान आणि खोडकेंचा इशारा
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी "ज्यांची मर्जी असेल ते सोबत येतील, ज्यांची नाही ते येणार नाही" असे सांगून संभ्रम अधिकच वाढवला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते आमदार संजय खोडके यांनी थेट अट घातली आहे की, "जर रवी राणा भाजपसोबत असतील, तर राष्ट्रवादी सोबत राहणार नाही." या 'व्हीटो पॉवर'मुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे.
advertisement
अमरावतीमध्ये एकूण जागा ८७ आहेत. बहुमताचा आकडा हा ४४-४५ वर आहे. त्यात भाजपचे संख्याबळ २५ आहे. तर, बहुमताचे मॅजिक फिगरसाठी भाजपला आणखी २० नगरसेवक हवे आहेत.
जर भाजपने राणा (१५) आणि राष्ट्रवादी (११) या दोघांनाही सोबत घेतले तर आकडा ५१ वर जातो. मात्र, खोडके आणि राणा यांच्यातील विस्तव जात नसल्याने भाजपला एकाची निवड करणे भाग पडणार आहे.
advertisement
महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर...
महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी ३० जानेवारी रोजी पहिली विशेष सभा बोलवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पीठासनाखाली ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. अमरावतीचे महापौरपद हे 'सर्वसाधारण' प्रवर्गासाठी असल्याचे सोडतीत जाहीर करण्यात आले आहे. या पदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत नगरसेवकांना हात उंचावून आपले मत द्यावे लागणार आहे.
advertisement
महापौर आणि उपमहापौर पदासाठीचे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी मंगळवारी (२७ जानेवारी) सकाळी ११.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 1:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amravati Mayor Election: महापौर पदाच्या पाठिंब्यावरून भाजपमध्येच दोन गट, वरिष्ठांची डोकेदुखी वाढली, अमरावतीत नवा ट्वि्स्ट










