Micro Art: चक्क पेन्सिलच्या टोकावर साकारले वेगवेगळे शिल्प, आशुतोषचे थक्क करणारे मायक्रो आर्ट, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
अंगी असलेली प्रत्येक चांगली कला ही माणसाला समृद्ध करते. आशुतोष खंडारेचा मायक्रो आर्टचा प्रवास थक्क करणारा आहे.
अमरावती: अंगी असलेली प्रत्येक चांगली कला ही माणसाला समृद्ध करते. प्रत्येक माणसात कुठली ना कुठली कला दडलेली असते. फक्त त्याला प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. असं म्हणतात की अंगी असलेली कला माणसाला उपाशी राहू देत नाही. याचेच एक उदाहरण म्हणजे अमरावती शहरातील आशुतोष प्रशांत खंडारे. आशुतोष हा सध्या 17 वर्षांचा असून फाउंडेशन कोर्स करत आहे.
अमरावती येथील श्री आर्ट कला वर्ग आणि कला निर्मिती याठिकाणी तो संचालक सारंग नागठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्याने मायक्रो आर्टद्वारे पेन्सिलच्या टोकावर वेगवेगळे शिल्प कोरले आहे. आशुतोष हा फाउंडेशन कोर्स करत आहे. त्याचा मायक्रो आर्टचा प्रवास थक्क करणारा आहे. त्याने आपल्या पहिल्या मायक्रो आर्टची सुरुवात एस (S) या इंग्रजी अक्षराने 2024 मध्ये केली. मायक्रो आर्टमध्ये गणपती, अंबादेवी, एकविरा देवी, विठ्ठल रुक्मिणी या मूर्ती छोट्याशा पेन्सिलच्या टोकावर आशुतोषने साकारल्या आहेत.
advertisement
इंग्रजीमधील एस (S) अक्षरापासून आशुतोषची मायक्रो आर्टला सुरुवात
आशुतोषचे शिक्षक प्रा. नागठाणे यांच्याशी लोकल 18 ने चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, मी 15 वर्षांपूर्वी श्री आर्ट कला वर्ग आणि कला निर्मितीची स्थापना केली. तेव्हापासून आतापर्यंत अनेक विद्यार्थी येथून मोठ्या पदावर काम करत आहेत. त्यातीलच एक विद्यार्थी म्हणजे आमचा आशुतोष. आशुतोष माझ्याकडे गेल्या 1 वर्षांपासून आहे. त्याने बेसिक कोर्सला प्रवेश घेतला आहे. त्याने मायक्रो आर्ट करायला 2024 पासून सुरुवात केली.
advertisement
त्याने सर्वात आधी पेन्सिलच्या टोकावर इंग्रजीमधील एस (S) हे अक्षर कोरले. त्यानंतर वेगवेगळे शिल्प कोरायला त्याने सुरुवात केली. आशुतोषला अनेक बक्षिसे मिळाली आहेत. अमरावतीसह त्याचे महाराष्ट्र राज्य व इतर राज्यांमध्ये अनेक चित्र प्रदर्शने झाली आहेत. मायक्रो आर्टमध्ये गणपती, अंबादेवी, एकविरा देवी, विठ्ठल रुक्मिणी या मूर्ती छोट्याशा पेन्सिलच्या टोकावर साकारून रसिकांची प्रशंसा त्याने मिळवली आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
आशुतोषला मिळाले 100 पेन्सिलचे काम
पुढे ते सांगतात की, या आषाढी एकादशीला आशुतोषने विठ्ठल रुक्मिणीचे शिल्प पेन्सिलच्या टोकावर कोरले. त्याचे हे काम बघता त्याला 100 पेन्सिलचे काम मिळाले आहे. त्यातून त्याला 2 लाख रुपये मानधन मिळणार आहे. असे अनेक कलाकार या श्री आर्ट कला वर्गाच्या कला वर्गात आपली कला दाखवत आहेत. आपण सर्वांनी या कलाकारांना प्रोत्साहन करावे व आपणास आवड असल्यास आपण सुद्धा या कला वर्गाचा भाग व्हावा असे आवाहन त्यांनी केले.
advertisement
विठ्ठल रुक्मिणीचे कोरीव शिल्प मुख्यमंत्र्यांना देण्याची इच्छा
आशुतोष सांगतो की, विठ्ठल रुक्मिणीचे कोरीव शिल्प मी 10 दिवसांत पूर्ण केले. त्यासाठी मी फक्त कटरचा वापर करतो. कटरच्या साहाय्याने मी सर्व कोरीव शिल्प तयार केले आहे. मी केलेल्या गणपती बाप्पाच्या शिल्पाला देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मी आणखी नवनवीन शिल्प तयार करणार आहे. यासाठी मला नागठाणे सरांचे नेहमी मार्गदर्शन लाभते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी कोरलेले विठ्ठल रुक्मिणीचे कोरीव शिल्प मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याची माझी इच्छा आहे, असे त्याने सांगितले.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
July 11, 2025 7:29 PM IST
मराठी बातम्या/अमरावती/
Micro Art: चक्क पेन्सिलच्या टोकावर साकारले वेगवेगळे शिल्प, आशुतोषचे थक्क करणारे मायक्रो आर्ट, Video

