Chandrakant Patil : 'माझ्या बॅगमध्ये 8 शर्ट, शाईफेक झाली की लगेच बदलतो अन्'; चंद्रकांत पाटलांनी सांगितली स्ट्रॅटेजी
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Chandrakant Patil : अमरावतीचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.
अमरावती, 20 ऑक्टोबर (संजय शेंडे, प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वीच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूरमध्ये शाईफेक करण्यात आली होती. चंद्रकांत पाटील आज अमरावती दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, हा बंदोबस्त गरजेचा नव्हता अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते म्हणाले, की मी कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार असतो. माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात. एकावर शाई फेकली की दुसरा शर्ट घालतो, तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो असं राज्याचे मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांच्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. रस्त्याच्या कडेवरील पान टपऱ्या, चहाच्या टपऱ्या महापालिकेने सुरू करू दिल्या नाही, यावर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला असावा. मात्र, मी त्यांना सांगितले काही होत नाही, जे व्हायचे ते चुकत नाही, मी कशालाही तयार असतो. माझ्या बॅगेत 8 शर्ट तयार असतात, एकावर शाई फेकली की मी दुसरा शर्ट घालून तयार असतो, 2 वेळा शाई फेकली, दोन्ही वेळा मी तिसऱ्या मिनिटाला बाहेर पडलो. सोलापूरला शाई फेकल्यानंतर मी 500 लोकांचे निवेदन स्वीकारले. सर्वसामान्यांना त्रास होईल एवढी जास्त सुरक्षा देऊ नये, असे देखील जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले, असे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
advertisement
सोलापुरात शाईफेक
चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. कंत्राटी भरती विरोधात भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याने घोषणाबाजी करत हे कृत्य केलं होतं. चंद्रकांत पाटील येणार म्हणून याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. पण त्यामधून या पदाधिकाऱ्याने पुढे जात शाईफेक केली होती.
advertisement
पहिल्यांदा पुण्यात घटना
पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदा भाजप नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. पाटील यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे कृत्य केल्याचं सांगितलं. शाईफेक करणारे कार्यकर्ते हे समता सैनिक दल या संघटनेचे होते. समता सैनिक दलाच्या मनोज गरबडे या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली होती. गरबडे हा अनेक वर्षांपासून समता सैनिक दलात कार्यरत आहे. तो चिंचवड परिसरात वास्तव्याला आहे. तसेच तो अनेक सामाजिक कार्यात देखील कार्यरत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 20, 2023 7:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Chandrakant Patil : 'माझ्या बॅगमध्ये 8 शर्ट, शाईफेक झाली की लगेच बदलतो अन्'; चंद्रकांत पाटलांनी सांगितली स्ट्रॅटेजी









