Ashok Kharat: खरातच्या काळ्या धंद्यात डॉक्टरांची गुंतवणूक? एसआयटीकडून ३ डॉक्टरांची कसून चौकशी, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ashok Kharat Case : खरातच्या 'हायप्रोफाईल' भक्त साखळीत नाशिकचे काही बडे डॉक्टर एसआयटीच्या (SIT) रडारवर आले आहेत. मंगळवारी तीन नामांकित डॉक्टरांची तब्बल पाच तास कसून चौकशी करण्यात आली.
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे धागेदोरे आता नाशिकमधील नामांकित वैद्यकीय क्षेत्रापर्यंत पोहोचले आहेत. खरातच्या 'हायप्रोफाईल' भक्त साखळीत नाशिकचे काही बडे डॉक्टर एसआयटीच्या (SIT) रडारवर आले असून, मंगळवारी तीन नामांकित डॉक्टरांची तब्बल पाच तास कसून चौकशी करण्यात आली. या कारवाईमुळे नाशिकच्या वैद्यकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
खरातच्या दुष्कृत्याचे कारनामे समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्यात आला. एसआयटीने आपली कसून चौकशी सुरू केली आहे. खरातकडून लैंगिक आर्थिक शोषण झालेल्या पीडितांची माहिती घेतली जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला खरातच्या या कृत्यात साथ देणाऱ्यांविरोधातही कारवाईचा फास आवळला जात आहे. खरातच्या 'कॅनडा कॉर्नर' येथील कार्यालयात केवळ सामान्य महिलाच नाही, तर प्रशासनातील उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नींनाही लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील काही पीडितांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
advertisement
डॉक्टरांची चौकशी कोणत्या मुद्यावर?
एसआयटीने या डॉक्टरांना खरातसोबतच्या आर्थिक संबंधांबाबत अनेक टोकदार प्रश्न विचारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रामुख्याने, या डॉक्टरांनी खरातच्या बेकायदेशीर व्यवसायात मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे का? वैद्यकीय व्यवसायाच्या आडून काही अवैध व्यवहार सुरू होते का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशोक खरात या डॉक्टरांच्या नावाचा वापर स्वतःसाठी 'कव्हर' (संरक्षण) म्हणून करत होता का? या मुद्द्यांवर पोलिसांनी माहिती जमा केली आहे.
advertisement
भोंदू खरातनं शाकाहारी व्यक्तींना प्रसादाच्या नावाखाली लुबाडलं
शेकडो महिलांच्या लैगिंक शोषणाचा आरोपी असणाऱ्या भोंदू खरातने कोट्यवधींची संपत्ती जमवली. खरातने आपला बोलबाला इतका केला की, त्याच्याकडे सामान्यांपासून ते उद्योजक, राजकारणी मंडळींची रीघ लागायची. त्यातूनच त्याने महिला भक्तांचे शोषण केल्याचे समोर आले. या प्रकरणाची चौकशी आता एसआयटी कडून सुरू असून या खरातची आणखी एक बंडलबाजी समोर आली आहे. अशोक खरातने शाकाहारी व्यक्तींना मासा पाण्यातील वनस्पती असल्याचे सांगत त्यांना खाऊ घातला.
advertisement
लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळून त्यांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या बंडलबाज खरातच्या फसवणुकीचे एकापेक्षा एक विचित्र प्रकार समोर येत आहेत. 'मासा ही वनस्पती आहे', असे सांगून त्याने अनेक शाकाहारी कुटुंबांना मासा खाण्यास भाग पाडल्याची धक्कादायक माहिती एसआयटी (SIT) तपासात उघड झाली आहे. या भोंदूने चक्क जैन धर्मीय व्यावसायिकांनाही आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 3:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat: खरातच्या काळ्या धंद्यात डॉक्टरांची गुंतवणूक? एसआयटीकडून ३ डॉक्टरांची कसून चौकशी, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ








