सावध व्हा! ठाण्यातल्या तरुणासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही होऊ शकतं, हातोहात एक लाखाला गंडवलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कोपरी परिसरातील एक्सिस बँकेच्या एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने दुर्गेशकुमार जयस्वाल यांना अज्ञात व्यक्तीने एक लाख रुपयांचा गंडा घातला, पोलिसांनी सतर्कतेचे आवाहन केले.
ठाण्यातील कोपरी परिसरात एटीएममध्ये मदत करण्याचे नाटक करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने तरुणाला तब्बल एक लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. एटीएमसमोर उभ्या असलेल्या त्या अनोळखी माणसावर विश्वास ठेवण्याची चूक पीडित व्यक्तीनं केली आणि याच अज्ञानाचा फायदा घेत चोरट्याने शांतपणे आपलं काम उरकलं. त्याने याच संधीचा गैरफायदा घेऊन लाखो रुपये उकळले आहेत.
२४ वर्षीय दुर्गेशकुमार प्रल्हाद जयस्वाल, वाघोबानगर, कळवा इथे राहतात. कामानिमित्त ते कोपरी परिसरातील आनंद सिनेमा जवळील स्टेशन रोडवरील एक्सिस बँकेच्या एटीएममध्ये गेले होते. तिथेच आधीपासून उभा असलेला अज्ञात तरुण त्यांना मदत करण्यासाठी पुढे आला. एटीएममध्ये अडचण आली तर सहजपणे विश्वास ठेवावा, अशी अनेकांची प्रवृत्ती असते, दुर्गेशकुमारही त्याला अपवाद नव्हते.
मदतीच्या बहाण्याने त्या व्यक्तीने एटीएमच्या स्क्रीनवर हात फिरवला, कार्ड काढण्यास सांगितलं, पुन्हा टाकायला सांगितलं… दरम्यान, त्याने चतुराईने दुर्गेशकुमार यांनी टाकलेला पासवर्ड पाहून घेतला. काही क्षणात "मशीन चालत नाही" असं सांगत तो आरोपी गायब झाला आणि दुर्गेशकुमार यांना त्याचं काहीच वेगळं वाटलं नाही. एटीएममधून बाहेर पडून थोड्या वेळातच त्यांच्या मोबाईलवर व्यवहाराचे मेसेज येऊ लागले. त्यांच्या खात्यातून तब्बल १ लाख २४७ रुपये काढल्याचं समजताच त्यांचा धक्काच बसला.
advertisement
एटीएममध्ये स्वतःच्या हातात कार्ड असतानाच कोणीतरी पैसे काढू शकतं, हे त्यांनी कधीच स्वप्नातही विचारलं नव्हतं. फसवणुकीची जाणीव होताच दुर्गेशकुमार यांनी तात्काळ कोपरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि त्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. एटीएममध्ये एका क्षणाचा निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, याचे हे आणखी एक उदाहरण असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
कुणालाही ATM देऊ नका, तुमचा पासवर्ड शेअर करुन नका, ATM मध्ये कुणावरही विश्वास ठेवू नका. तुमचा पासवर्ड कुणालाही दिसणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन पोलिसांनी यावेळी केलं आहे. आपली एक छोटी चूक महागात पडू शकते. त्यामुळे ATM वापरताना सजक राहाणं खूप गरजेचं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 1:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सावध व्हा! ठाण्यातल्या तरुणासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही होऊ शकतं, हातोहात एक लाखाला गंडवलं


