नगरमध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडावर जीवघेणा हल्ला, महिला कलावंतांना लाथाबुक्क्यांनी मारहाण
- Published by:Prachi Amale
- Reported by:Harish Dimote
Last Updated:
विठाबाई नारायणगावकर यांचे सुपुत्र आणि मंडळाचे प्रमुख महेश नारायणगावकर यांनाही या नराधमांनी सोडले नाही, त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे.
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून लोककलेचा वारसा जपणाऱ्या कलाकारांवर झालेल्या अमानुष हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या दिवंगत तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा मंडळातील पुरुष आणि महिला कलाकारांना संगमनेरच्या वरुडी पठार भागात बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने कलाक्षेत्रात तीव्र संतापाची लाट उसळली असून गुन्हेगारांच्या मुजोरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा मानबिंदू असलेल्या तमाशा कलेचा गौरव करणाऱ्या 'विठाबाई नारायणगावकर' तमाशा फडावर संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार परिसरात हल्ला झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी किरकोळ कारणावरून वाद उकरून काढत इतर सहकाऱ्यांना बोलावले आणि तमाशा फडातील कलाकारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात अनेक पुरुष कलाकार गंभीर जखमी झाले असून महिला कलाकारांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
advertisement
नेमकं काय झालं?
मिळालेल्या माहितीनुसार, तमाशा फडाची गाडी जात असताना दुचाकीला कट मारल्याचा आरोप करत दोन तरुणांनी गाडी अडवली. सुरुवातीला बाचाबाची झाली मात्र काही वेळातच या तरुणांनी फोन करून आपल्या इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर
टोळक्याने तमाशआ कलाकारांवर हल्ला केला. विठाबाई नारायणगावकर यांचे सुपुत्र आणि मंडळाचे प्रमुख महेश नारायणगावकर यांनाही या नराधमांनी सोडले नाही, त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे.
advertisement
तमाशा मंडळातील कलाकार प्रचंड दहशतीखाली
या हल्ल्यामुळे तमाशा मंडळातील कलाकार प्रचंड दहशतीखाली आहेत. रात्री-अपरात्री प्रवास करून गावागावात लोककला पोहोचवणाऱ्या या कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जखमी कलाकारांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मारहाणीचे नेमके कारण काय?
घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचे काम सुरू झाले आहे. फिर्याद दाखल झाल्यानंतर मारहाणीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस तपासातच आरोपींची ओळख स्पष्ट होणार आहे.
advertisement
कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
चैत्र आणि वैशाख महिन्यात यात्रा आणि जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. गावागावात यात्रा आणि जत्रांना तमाशा असल्याशिवाय उत्साह येत नाही. त्यामुळे तमाशांसाठी सध्या कलाकारांचा या गावातून त्या गावात प्रवास सध्या सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 7:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नगरमध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडावर जीवघेणा हल्ला, महिला कलावंतांना लाथाबुक्क्यांनी मारहाण






